लाचखोर तलाठ्याला पाठलाग करून पकडले, लाचलुचपत विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2023 12:03 PM2023-04-04T12:03:15+5:302023-04-04T12:03:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : पालघर तालुक्यातील अल्याळी, शिरगावचे तलाठी महेशकुमार जनार्दन कचरे (वय ४६) याला १० हजार रुपयांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क, पालघर : पालघर तालुक्यातील अल्याळी, शिरगावचे तलाठी महेशकुमार जनार्दन कचरे (वय ४६) याला १० हजार रुपयांची लाच घेऊन गल्लीबोळातून पळत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर वथकाने पाठलाग करून रंगेहाथ पकडले. जमिनीत केलेल्या फेरफारची महसूल अभिलेखात नोंद करण्यासाठी कचरे याने एका व्यक्तीकडून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारली होती.
पालघर तालुक्यातील अल्याळी तलाठी कार्यालय क्षेत्रात एका व्यक्तीने जमीन खरेदी केली असल्याने या जमिनीची नोंद अभिलेखात करण्यासाठी महेश कचरे यांनी या नागरिकाकडून १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती ही रक्कम १० हजार रुपयापर्यंत देण्याचे ठरले. यासंदर्भात तक्रारदार व्यक्तीने २९ मार्च रोजी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याबाबत विभागाने तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सोमवारी तक्रारदाराला आरोपीने प्रथम अल्याळी येथे बोलावले. नंतर पालघर सर्कल ऑफिस तसेच तहसीलदार कार्यालय असे फिरवून शेवटी तक्रारदाराच्या कारमध्ये बसून ते स्टेशन परिसरात पोहचले.
कारमध्ये बसल्यावर आरोपी तलाठीने लाचेची रक्कम घेऊन डॉ. कांता हॉस्पिटलच्या गल्लीत उतरल्यावर तो पायी जात असताना आपल्या पाळतीवर पोलिस असल्याचा संशय आल्यावर आरोपी पळू लागला.
उपअधीक्षक जखमी
तात्काळ पोलिस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोनि. स्वपन बिश्वास, हवालदार विलास भोई, संजय सुतार, योगेश धारणे, निशा मांजरेकर, नवनाथ भगत, दीपक सुमडा आदींनी त्याचा पाठलाग करणे सुरू केले. अनेक हुलकावण्या देत पळून जात असताना मोठ्या शिताफीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. या पाठलागादरम्यान उपअधीक्षक जगताप यांना किरकोळ दुखापत झाली.