किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया परवानगीसाठी दीड लाखांची मागितली लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:55 PM2018-10-02T14:55:16+5:302018-10-02T16:47:17+5:30
परवानगी देण्यासाठी ८० हजार घेताना जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक म्हणून काम करणारा तुषार सावरकर (वय ३४) आणि रहेजा रुग्णालयात ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेटर सचिन साळवे (वय ३२)या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई - किडनी प्रत्यारोपण शस्रक्रियेच्या कायदेशीर परवानगीसाठी दीड लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार जे. जे. रुग्णालयात उघडकीस आला आहे. परवानगी देण्यासाठी ८० हजार घेताना जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक म्हणून काम करणारा तुषार सावरकर (वय ३४) आणि रहेजा रुग्णालयात ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेटर सचिन साळवे (वय ३२)या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल ताब्यात घेण्यात आले आहे. ४ ऑक्टोबरपर्यंत या दोघांना पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.
एका रुग्णाला रहेजा रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची होती. याकरिता कायदेशीर परवानगी घ्यावी लागेल असे रहेजा रुग्णालयामार्फत रुग्णाला सांगण्यात आले. ही प्रक्रिया तसेच परवानगीसाठी रहेजा रुग्णालयात ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेटर म्हणून काम करणारा सचिन साळवे याला मदतीस देण्यात आले. सचिन याने रुग्णाच्या अहवालाची फाइल जे. जे. रुग्णालयात समाजसेवा अधीक्षक तुषार सावरकर यांच्याकडे पाठवली. ही फाइल लवकरात लवकर मंजूर व्हावी आणि परवानगी मिळावी यासाठी सचिनने स्वतःसाठी आणि तुषार सावरकर यांच्यासाठी दीड लाख रुपयांची रुग्णाकडे मागणी केली. इतकी मोठी रक्कम एकत्र देणं शक्य नसल्याने ८० हजारांपर्यंत तडजोड करण्यात आली. संबंधित रुग्णाने हा सर्व प्रकार आपल्या मित्राला सांगितला. त्याने पैसे न देता याबाबत एसीबीकडे तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा करून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तुषार सावरकर यांच्या कार्यालयात काल सापळा लावला. या कार्यालयात ८० हजारांची रोकड घेताना सचिन याला रंगेहाथ पकडण्यात एसीबीला यश आले आहे.