Bribe: रेती वाहतूकदाराकडून लाच घेणारा पाेलीस उपनिरीक्षक अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:54 AM2022-09-02T07:54:37+5:302022-09-02T07:54:53+5:30
Bribe News: ७५ हजार रुपयांची मागणी करीत तडजाेडीनंतर ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्यातील पाेलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
नागपूर : पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रेतीची वाहतूक करण्यासाठी प्रति ट्रक १५ हजार रुपयांप्रमाणे पाच ट्रकसाठी ७५ हजार रुपयांची मागणी करीत तडजाेडीनंतर ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या बेला (ता. उमरेड) पाेलीस ठाण्यातील पाेलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. १) रात्री ९ वाजताच्या सुमारास बेला परिसरात करण्यात आली.
दिलीप पुंडलिक सपाटे (वय ५७, फ्रेंड्स काॅलनी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या लाचखाेर पाेलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारकर्ता बिलालनगर (ता. मंगरूळपीर, जिल्हा वाशिम) येथील असून, त्यांचे काही ट्रक बेला परिसरातून रेतीची वाहतूक करतात. ही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दिलीप सपाटे याने त्यांना प्रति ट्रक १५ हजार रुपयांप्रमाणे ७५ हजार रुपयांची मागणी केली हाेती. लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नाेंदविली व दिलीप सपाटे याला ४५ हजार रुपये देण्याचे कबूल केले.
ठरल्याप्रमाणे त्यांनी दिलीप सपाटेला गुरुवारी रात्री ४५ हजार रुपये दिले आणि परिसरात दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली. गुन्हा दाखल हाेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती. ही कारवाई एसीबीचे पाेलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पाेलीस अधीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक योगिता चाफले, पोलीस निरीक्षक आशिष चौधरी व वर्षा मते, सुरेंद्र सिरसाट, अनिल बहिरे, अस्मिता मल्लेलवार, अमोल मेंघरे, हर्षलता भरडकर यांच्या पथकाने केली.