लाचखोर शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:57 PM2018-08-28T19:57:59+5:302018-08-28T20:10:14+5:30
आज सकाळी 10 वाजता वसई पंचायत समितीत तडजोडीची अर्धी रक्कम अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ब्रिजेश गुप्ताला ठाणे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक वाल्मिक पाटील व त्यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ अटक केली.
वसई – वसई पंचायत समितीच्या लाचखोर शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याला अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळी 10 वाजता वसईत रंगेहाथ अटक करण्यात आली. या घटेनमुळे शिक्षण विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. ब्रिजेश बाकेलाल गुप्ता (वय - 41) असे या अटक करण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.हा आरोपी विरार येथील .फ्रंट व्यु,फेज- 2 पुरुषोत्तम पारेख रोड येथे राहणारा आहे.
या प्रकरणी वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नायगाव येथील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेने या संदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 5 जुलै रोजी रीतसर तक्रार दिली होती. दरम्यान,वसईतील सेव्हन-स्वेअर अकॅडमी, नायगाव या शाळेच्या मुख्याधापिकेने आपल्या शाळेच्या इयत्ता 6 वी ते 12 वीच्या वर्गाच्या मान्यतेसाठी वसई शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता, त्यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी ब्रिजेश गुप्ता यांनी स्वतः साठी व इतर लोकसेवक यांच्यासाठी सहा लाख रुपये लाच म्हणून मागितले होते, मात्र तडजोडीत पाच लाख रुपये देण्याचे ठरले. परिणामी, आज सकाळी 10 वाजता वसई पंचायत समितीत तडजोडीची अर्धी रक्कम अडीच लाख रुपयांची लाच स्विकारताना ब्रिजेश गुप्ताला ठाणे एसीबीचे पोलीस उपाधीक्षक वाल्मिक पाटील व त्यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ अटक केली.