लायसन्स सस्पेंड करण्याच्या नावाखाली उकळली जाते लाच; वाहतूक शाखेच्या पोलिसाला सापळा रचून पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 10:53 PM2018-12-11T22:53:45+5:302018-12-11T22:54:13+5:30
एका विद्यार्थ्यांने दंड भरल्यानंतरही त्याला लायसन्स सस्पेंड करण्याची धमकी देऊन लाच मागणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा-याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी पकडले.
पुणे : वाहतूकीचे नियम मोडणा-यांवर शहर पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी दोनपेक्षा अधिक वेळा नियमभंग करणा-यांचे लायसन्स सस्पेंड करण्याचा इशारा दिला असून आतापर्यंत अनेकांचे लायसन्स काही कालावधीसाठी आरटीओने निलंबित केले आहेत. वरिष्ठांच्या या कठोर कारवाई करण्याच्या आदेशाचा आता पोलीस कर्मचारी गैरफायदा घेऊन लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. एका विद्यार्थ्यांने दंड भरल्यानंतरही त्याला लायसन्स सस्पेंड करण्याची धमकी देऊन लाच मागणा-या वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचा-याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी पकडले.
पोलीस नाईक चंद्रकांत रासकर (वय ३८, नेमणूक चतु:श्रृंगी वाहतूक विभाग) असे त्यांचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी, फर्ग्युसन महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने सेनापती बापट रोडवरील जे. डब्ल्यु मेरियड चौकात मंगळवारी सकाळी वाहतूक नियमभंग केल्याने रासकर यांनी त्याला बाजूला घेतले. त्याने २०० रुपये दंड भरला. त्यानंतर रासकर यांनी तुझे लायसन्स सस्पेंड करतो, असे त्याला सांगितले. त्यावर या विद्यार्थ्याने तसे करु नका. मी बाहेरगावाहून आलो आहे़ माझी अडचण होईल असे सांगितले. त्यावर रासकर यांनी त्याच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली.तेव्हा हा विद्यार्थी माझ्याकडे इतके पैसे नाहीत असे सांगितले़ त्यावर रासकर यांनी त्याला ५०० रुपये घेऊन ये मग लायसन्स देतो, असे सांगितले. त्यानंतर या विद्यार्थ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता रासकर यांनी ४०० रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेनापती बापट रोडवरील जे. डब्ल्यु मेरियट चौकात सापळा रचला. तक्रारदाराकडून सायंकाळी ४०० रुपये घेतला रासकर यांना पकडण्यात आले. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.