लाचखोर पोलीस एसीबीच्या हातावर तुरी देऊन पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 05:44 PM2018-10-26T17:44:37+5:302018-10-26T17:44:59+5:30
काल दुपारी १. १५ वाजताच्या सुमारास हा सापळा एसीबीने रचला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस शिपाई पद्माकर आसवले (वय ४७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर - एका भंगार विक्रेत्याकडून 50 हजाराची लाच घेणारा हिललाईन पोलीस ठाण्याचा पोलीस शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. काल दुपारी १. १५ वाजताच्या सुमारास हा सापळा एसीबीने रचला होता. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात लाचखोर पोलीस शिपाई पद्माकर आसवले (वय ४७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरातील एका भंगार विक्रेत्याच्या भंगार गाडीवर कारवाई न करण्यासाठी 80 हजाराची लाच हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई पद्माकर आसवलेने मागितली. तोडजोड केल्यानंतर 50 हजार देण्याचे ठरले. दरम्यान, भंगार विक्रेत्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. काल दुपारी १. १५ वाजता कॅम्प नं-5, सह्याद्रीनगर रस्त्यावर लाच घेण्यासाठी आसवले येणार असल्याने एसीबीने सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे आसवले पैसे घेण्यासाठी आले. भंगार विक्रेत्याकडून 50 हजाराची रोख रक्कम स्विकारल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ अटक करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की करत मोटारसायकलीवरून आसवलेने पलायन केले. एसीबीचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिकी पाटील यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पद्माकर आसवलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आसवलेचा शोध पोलीस घेत आहेत.