१५ लाख रुपयांच्या ड्रग्जसह ब्रिटिश नागरिकाला अटक, क्राईम ब्रॅंचकडून कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 16:23 IST2023-12-05T16:23:29+5:302023-12-05T16:23:37+5:30
अटक करण्यात आलेल्याचे नाव जॉन विल्यम पर्किन्सन (५२) असे आहे.

१५ लाख रुपयांच्या ड्रग्जसह ब्रिटिश नागरिकाला अटक, क्राईम ब्रॅंचकडून कारवाई
पणजी : गोवा पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचकडून एक नियोजनबद्ध कारवाई करताना एका ब्रिटिश नागरिकाला ड्रग्जसह पकडले. त्याच्याकडे 15 लाख रुपये किमतीचा एलएसडी हा अंमली पदार्थ सापडला. अटक करण्यात आलेल्याचे नाव जॉन विल्यम पर्किन्सन (५२) असे आहे.
जॉन विल्यम पर्किन्सन हा गोव्यात ड्रग्जचा व्यवहार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वागातोर येथील फुटबॉल मैदानाच्या पाठीमागील गेटकडे लिव्हज क्लबजवळ ड्रग्ज तस्कर येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी दबा धरून बसले होते.
जॉन विल्यम पर्किन्सनने ग्राहकाला सुद्धा तिथेच बोलावले होते. ठरल्याप्रमाणे जॉन विल्यम पर्किन्सन तिथे ड्रग्स घेऊन आला आणि ग्राहकाची वाट पाहू लागला. परंतू त्यापूर्वीच तिथे दबा धरून बसलेले क्राईम ब्रॅंचचे निरीक्षक नारायण चिमूलकर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने त्याला घेरले व मुद्देमालासह अटक केली.
जॉन विल्यम पर्किन्सनच्या विरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जॉन विल्यम पर्किन्सन ज्या दुचाकीवरून आला होता, ती दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. शिवाय त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.