संतापजनक! ‘शिवचरित्रा’च्या बहाण्याने घरात घुसला अन्..; सुप्रिया शिंदेच्या हत्येचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 08:34 IST2022-02-19T08:34:21+5:302022-02-19T08:34:50+5:30
तपासादरम्यान सुप्रियाच्या घराबाहेर विशिष्ट प्रकारच्या चपला दोन वेळेला दिसल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांकडून मिळाली.

संतापजनक! ‘शिवचरित्रा’च्या बहाण्याने घरात घुसला अन्..; सुप्रिया शिंदेच्या हत्येचा उलगडा
डोंबिवली : अतिप्रसंगाला विरोध दर्शविल्याने सुप्रिया शिंदे हिला शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट या तरुणाने ठार मारले आणि तिचा मृतदेह सोफा कम बेडमध्ये कोंबला, असे मानपाडा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. डोक्यावर प्रहार करून आणि गळा आवळून तिची हत्या झाली होती. तिच्या घराबाहेर दिसलेल्या चपलेवरून हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
दावडी परिसरात राहणाऱ्या सुप्रियाचा मृतदेह घरातील सोफा कम बेडमध्ये मंगळवारी रात्री आढळला होता. आरोपी सुप्रियाच्या परिचयाचा असावा, असा पोलिसांचा अंदाज खरा ठरला आहे. सुप्रियाचा पती किशोर ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना विशाल किशोरबरोबर होता. परंतु, सुप्रियाचा मृतदेह आढळल्यानंतर तो दिसला नाही. विशालला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘शिवचरित्रा’च्या बहाण्याने घरात घुसला
सुप्रियाच्या कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आस्था आहे. छत्रपतींच्या जीवनावरील पुस्तके वाचली जात होती. ही माहिती विशालला होती. मंगळवारी तिचा मुलगा शाळेत गेल्यावर तो शिवचरित्रचे पुस्तक देण्याच्या बहाण्याने तिच्या घरात घुसला. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्याने हत्या केल्याचे तपासात उघड झाले.
दोनदा दिसली ‘ती’ चप्पल
तपासादरम्यान सुप्रियाच्या घराबाहेर विशिष्ट प्रकारच्या चपला दोन वेळेला दिसल्याची माहिती सोसायटीतील रहिवाशांकडून मिळाली. ज्यावेळी घटना घडली तेव्हाही त्याच चपला घराच्या बाहेर होत्या. अखेर हाच धागा पकडून पोलिसांनी शोध सुरू केला आणि त्या चपला शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशालच्या होत्या हे स्पष्ट झाले.