आरटीओतील बदलीसाठी दलाल सक्रिय; पॉश हॉटेलमध्ये पुणेवाला डेरेदाखल

By नरेश डोंगरे | Published: March 8, 2023 08:20 PM2023-03-08T20:20:04+5:302023-03-08T20:20:49+5:30

गेले वर्षभरापासून राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आहे. 

Broker active for transfer in RTO in Nagpur | आरटीओतील बदलीसाठी दलाल सक्रिय; पॉश हॉटेलमध्ये पुणेवाला डेरेदाखल

आरटीओतील बदलीसाठी दलाल सक्रिय; पॉश हॉटेलमध्ये पुणेवाला डेरेदाखल

googlenewsNext

नागपूर : शहरातील एका पॉश हॉटेलमध्ये थांबलेला एक व्यक्ती दलालांच्या माध्यमातुन आरटीओतील बढती बदलीसाठी अनेकांशी संपर्क साधत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मोठ्या रकमेची डील असल्याने ही चर्चा करणाऱ्यांनी शहानिशा चालविल्यामुळे संबंधित वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. गेले वर्षभरापासून राज्यातील प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) वादग्रस्त विषयांमुळे चर्चेत आहे. 

महाराष्ट्रात सत्तांतरापूर्वी आणि आता सत्तांतरानंतरही बदलीच्या  संबंधाने सुरू असलेली चर्चा थांबायला तयार नाही. या पार्श्वभूमीवर, बढती बदलीसाठी फिल्डिंग लावून असणारे आरटीओतील  रॅकेट राज्यभरातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आपल्या दलालाच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांच्याकडून वसुली करतात. कोट्यावधी रुपयांची यातून उलाढाल होते. त्यानंतर ठराविक ठिकाणी बढती बदलीची यादी तयार होते. प्रचंड मोठी रक्कम हाती पडत असल्यामुळे बढती बदलीच्या रॅकेटची सूत्रे आपल्या हाती यावी म्हणून आरटीओतील अनेक 'रिटायर्ड' दरवर्षी फिल्डिंग लावतात. गेल्या वर्षभरापासून पुण्यातील एका व्यक्तीने अशाच प्रकारे प्रयत्न चालविले आहे. मात्र कुणी ना कुणी त्यात 'खाडे' टाकत असल्याने या व्यक्तीच्या नावावर नेहमी खाडाखोड होते. 

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून हा निवृत्त अधिकारी पुन्हा जोमाने सक्रिय झाला. त्याने राज्यातील आरटीओत होणाऱ्या सर्व बदल्याचे कंत्राट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहे. त्यात त्याला यश आले की नाही, हे कळायला मार्ग नाही. मात्र तो आता नागपुरात आला असून एका पॉश हॉटेलमध्ये थांबून त्याने आपल्या दोन दलालाच्या माध्यमातून नागपूर विदर्भातील अधिकारी कर्मचाऱ्यांना बढती बदली साठी ऑफर दिल्याची चर्चा आहे. या दोन दलालात एक महिला आहे, हे विशेष! संबंधित सूत्रानुसार, या दलालाने बदलीसाठी इच्छुक असणाऱ्यांना शंभर टक्के पाहिजे त्या ठिकाणी बदली करून देण्याची गॅरंटी दिल्याचे समजते.

.... म्हणून चर्चा बाहेर 
सध्या सर्वत्र वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे नाव सांगून बढती, बदली नियुक्तीसाठी पैसे मागून फसवणूक केली जात असल्याने आणि तशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होत असल्यामुळे काहींनी शहानिशा चालविली. त्यातूनच बदली बढतीच्या ऑफरची चर्चा परिवहन खात्यातून बाहेर आली आहे.

यासंबंधी माहिती नाही : विजय चव्हाण 
या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता आपल्याकडे या संबंधाने कसलीही माहिती नसल्याचे ते म्हणाले.

Web Title: Broker active for transfer in RTO in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.