भाऊ आणि भावजयीची करणीच्या संशयावरून ओल्या वस्त्राने धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 09:31 AM2021-11-29T09:31:38+5:302021-11-29T09:32:09+5:30
Crime News : करणी केल्याच्या संशयावरून मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा (ता. पाचोरा) येथे बुधवारी सकाळी घडली.
पाचोरा (जि. जळगाव) : करणी केल्याच्या संशयावरून मोठा भाऊ आणि भावजयीची ओल्या वस्त्रानिशी गावातून धिंड काढल्याची घटना सारोळा (ता. पाचोरा) येथे बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत लहान भाऊ व त्याच्या परिवारासह सात जणांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोघा भावांमधील अंतर्गत वाद असला, तरी या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. देवीदास पाटील, मंगलाबाई पाटील, गणेश पाटील, ज्योती पाटील, मयूरी पाटील, अनिल पाटील व विलास शिंदे अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रमेश पाटील व रंजनाबाई रमेश पाटील हे सारोळा येथे मुलगा शांताराम व सून दैवशाला हिच्यासह वास्तव्यास आहेत. रंजनाबाईने गाईवर करणी केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल झालेल्या सातही जणांनी बुधवारी रंजना व तिच्या पतीच्या अंगावर पाणी टाकले आणि ओल्या कपड्यानिशी गावातून धिंड काढली. त्यानंतर मारुतीच्या मूर्तीवर पाणी टाकण्यास भाग पाडले. शनिवारी सकाळीही पुन्हा आरोपींनी पीडित कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर अंनिस कार्यकर्त्या दर्शना पवार (अमळनेर), अंनिसचे तालुकाध्यक्ष प्रा. अतुल सूर्यवंशी यांच्या मदतीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. समोरच्या गटानेही रमेश पाटील व त्यांच्या परिवाराविरुद्ध फिर्याद दिली आहे.
करणीच्या संशयावरून हा प्रकार झाला असल्याचा संशय आहे. पाणी कुणी टाकले?, धिंड काढली की स्वतःहून पाणी टाकायला गेले हा तपासाचा भाग आहे. फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. गावात चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे.
- किसनराव नजन पाटील,
पोलीस निरीक्षक, पाचोरा