दादा परत ये... लहान भावाचा आक्रोश, मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 05:05 PM2022-02-20T17:05:23+5:302022-02-20T17:05:51+5:30
Drowning Case : अखेर दुपारी पावणेचार वाजता खोल पाण्यात पाणबुड्या उदय निंबाळकर यांना अनिरुद्धचा मृतदेह हाती लागला.
कळंबा : रविवारी सकाळी साडे आकरा वाजता महाविद्यालयीन मित्रांसोबत पोहावयास गेलेला अनिरुद्ध संभाजी घाटगे वय २१ रा. सरनाईक कॉलनी शिवाजी पेठ याचा धाप लागून बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी ही बाब फायर ब्रिगेड आणि पोलिसांना फोन वरून कळवली. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन विभाग कर्मचारी, जीवरक्षक, रेस्क्यू टिम व ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत शोध मोहीम राबवली. अखेर दुपारी पावणेचार वाजता खोल पाण्यात पाणबुड्या उदय निंबाळकर यांना अनिरुद्धचा मृतदेह हाती लागला.
याबाबत सविस्तर वृत्त असे , शिवाजी पेठेतील सरनाईक गल्लीत राहणाऱ्या संभाजी घाटगे यांचे कपडे इस्त्रीचा व्यवसाय असून मोठा मुलगा अनिरुद्ध शहरातील एका खाजगी महाविद्यालयात बी .कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. प्रत्येक रविवारी मित्रांसोबत तपोवन मैदानावर पोलीस भरती आणि एन सी सी सराव करण्यासाठी अनिरुद्ध येत होता. रविवारी सकाळी आकरा वाजता आठवड्याच्या शिबिराचा सराव संपताच शिबिरातील आठ- दहा मित्रांसोबत अनिरुद्ध कळंबा तलावात पोहण्यासाठी उतरला. पोहण्याचा जुजबी सराव असणारा अनिरुध्द पोहत तलावाच्या काठाकडे येत असताना अनिरुद्ध व त्याच्या मित्राला धाप लागली. पोहण्यासाठी पाण्यात आत गेलेल्या दोघांची धाप वाढत असल्याचे शिबिरातील अन्य मुलांना निदर्शनास येताच त्यांनी दोघांच्या मदतीसाठी धाव घेतली तोवर अनिरुद्ध गटांगळ्या खात पाण्यात बुडाला होता तर बुडणाऱ्या मित्राला वाचण्यास सहकाऱ्यांना यश आले. या घडल्या प्रकाराची माहिती सोबत आलेल्या मित्रांनी स्थानिक नागरिकांना दिली. स्थानिक नागरिकांनि सदरची बाब तात्काळ पोलीस व अग्निशमन दलाससह घरच्यांना फोन करून कळवली. करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलिस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ,स्थानिक नागरिक,नातेवाईक मित्रपरिवार ,जीवरक्षक व रेस्क्यु टीमने नौकेतुन बुडालेल्या अनिरुद्ध घाडगेचा तब्बल चार तास शोध केला. अखेर सायंकाळी पावणेचार वाजता तलाव पात्रात दूरवर खोल पाण्यात गाळात रुतलेला मृतदेह जीवरक्षक उदय निंबाळकर यांच्या हाती लागला.
याबाबत करवीर पोलिसांत नोंद करण्यात आली असून उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चौकट मन हेलवणारा आक्रोश घटनास्थळी अनिरुद्धच्या वडील व भावाला अनिरुद्ध बुडुन मरण पावल्याचा विश्वास बसत नव्हता. लहान भावाचा 'दादा परत ये 'आणि वडिलांनी केलेला 'अनिरुद्ध बाळा असे कसे झाले' हा आक्रोश ऐकून जमलेले नातेवाईक मित्र परिवार व ग्रामस्थ हेलावून गेले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढताच अनिरुद्धची धिप्पाड शरीरयाष्टी पाहून युवकांना गहिवरून आले. कर्मचारी नियुक्ती बाबतीत उदासीनता पालिका मालकीच्या कळंबा तलावावर संवर्धन देखभाल करण्यासाठी एकही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नसल्याने गैर प्रकारांत वाढ होत आहे त्यामुळे तात्काळ कर्मचारी नियुक्तीची मागणी नागरिकांतून व्यक्त होत होती.