बहिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली भाऊ २ वर्ष कैदेत; आता कोर्टासमोर खळबळजनक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 05:01 PM2021-09-02T17:01:38+5:302021-09-02T17:03:02+5:30
२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला
मुंबई – शहरातील कोर्टाने एका व्यक्तीला अल्पवयीन बहिणीचा बलात्कार केल्याचा आरोपाखाली दोषी ठरवत त्याला २ वर्षाची शिक्षा सुनावली. आरोपी भाऊ २ वर्ष जेलमध्ये बंद होता. परंतु आता त्याच्या बहिणीनं कोर्टासमोर सत्य आणल्यानं मोठा खळबळजनक खुलासा झाला आहे. खोटं बोलून भावाची फसवणूक केल्याचं बहिणीनं कोर्टासमोर कबुल केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.
२०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीनं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार नोंदवली होती. या मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं की, २०१७ मध्ये जेव्हा मी घरात कुणी नव्हतं तेव्हा माझ्या भावानं माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये पुन्हा संधी मिळताच त्याने तोच प्रकार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ दखल घेत कारवाई केली. हे प्रकरण कोर्टात पोहचलं. पोलीस तपास, मुलीचा जबाब आणि दोन साक्षीदारांच्या हवाल्याने कोर्टात भावाला दोषी ठरवण्यात आलं. कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपी २ वर्ष कैदेत होता. त्यानंतर आता आरोपीची बहिण दिंडोशी कोर्टात पोहचली आणि तिने भावाने माझा बलात्कार केला नाही असं कबुल केले आहे.
काय आहे प्रकरण?
अल्पवयीन मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला जात होती. ही गोष्ट तिच्या भावाला समजल्यानंतर त्याने बहिणीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला विरोध केला. अनेकदा मारहाणही केली. त्यावरुन नाराज झालेल्या बहिणीनं भावाविरोधात तक्रार दाखल केली. आता या मुलीच्या कबुलीनाम्यावरुन कोर्टाने आरोपीला निर्दोष ठरवत त्याची सुटका केली आहे. याचबरोबर युवकाच्या बहिणीनं तक्रार दाखल करताना तिची मेडिकल चाचणी केली नव्हती असंही सांगितलं आहे.
आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २ वर्ष या युवकाचं जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण करणार? अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. डॉ. मनस्वी अस्थाना म्हणतात की, अशाप्रकारे खोट्या तक्रारी आणि घरगुती वादातून नात्यांमध्ये दुरावा वाढत चालला आहे. हे भविष्यासाठी चांगले नाही. लोकांमधील भावनिक नातं संपत चाललं आहे. खोट्या तक्रारी देऊन बदला घेण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यासाठी तोडगा काढायला हवा असं त्यांचे म्हणणं आहे.