आईसमोरच कोयत्याने वार करत भावाची हत्या; पालघर-सातपाटीत घरकुलाच्या वादातून घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 01:14 PM2024-10-31T13:14:20+5:302024-10-31T13:14:33+5:30
साखरेपाडा येथे आरोपी सतीश पाटील हा लहान भाऊ चंद्रकांत पाटील (वय ३३) याच्यासह राहत होता.
पालघर : आईला मंजूर झालेले घरकुल कोणी बांधावे, यावरून झालेल्या भांडणात सख्ख्या भावावर आईसमोरच कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केल्याचा प्रकार माहीम गावातील साखरेपाडा येथे समोर आला आहे. सतीश जेठू पाटील (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यानंतर पसार झालेल्या सतीशला सातपाटी सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश जाधव यांनी ताब्यात घेतले.
साखरेपाडा येथे आरोपी सतीश पाटील हा लहान भाऊ चंद्रकांत पाटील (वय ३३) याच्यासह राहत होता. जुन्या घरात एक आडवी भिंत घालून हे दोन्ही भाऊ वेगवेगळे राहत होते. त्यांच्या आईचे घरकुल कोणी बांधावे यावरून दोन्ही भावांमध्ये मोठा वाद होता. त्यातच भाऊ आपल्या मुलाला आरोपीच्या घरी जाऊ देत नसल्याचा रागही उफाळून यायचा.
आईवरही उगारला कोयता
बुधवारी दुपारी घरकुलावरून या दोन भावांमध्ये पुन्हा मोठा वाद झाला. या वेळी सतीश घरातील कोयता उचलून लहान भावाला मारण्यास धावला. तेव्हा हा वाद सोडवण्यासाठी पुढे होत आईने मुलाच्या हातातील कोयता हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने आईच्या अंगावरच कोयता उगारत ‘तू बाजूला हो, नाहीतर तुलाही मारून टाकीन,’ असे धमकावले.
आई घाबरून बाजूला झाल्यानंतर सतीशने आपल्या लहान भावाच्या मानेवर, पाठीवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात भाऊ चंद्रकांत याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पळून गेलेल्या आरोपीचा माग काढण्यास सातपाटी पोलिसांनी सुरुवात केली. शोधमोहिमेनंतर एका वाडीत लपलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करीत आहेत.