बहिणीची छेड काढणाऱ्या गुन्हेगाराला संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 09:29 PM2020-01-31T21:29:40+5:302020-01-31T21:30:45+5:30
विवाहित बहिणीच्या घरात शिरून छेडखानी करणाऱ्या गुन्हेगाराला भावाने आपल्या साथीदाराच्या मदतीने संपविले. ही घटना गुरुवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाहित बहिणीच्या घरात शिरून छेडखानी करणाऱ्या गुन्हेगाराला भावाने आपल्या साथीदाराच्या मदतीने संपविले. ही घटना गुरुवारी रात्री कळमना पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली.
पोलिसांनी खुनाचा सुत्रधार राजा पुंडलिक भारती (२०) रा. मिनिमातानगर यास अटक केली आहे. त्याचा साथीदार आकाश मेहता हा फरार आहे. मृत रोशन शंकर चौरसिया (२७) भिलगाव, वाठोडा हा आहे. रोशन कामठीत कोळश्याचा व्यवसाय करतो. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्या विरुद्ध खुनासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो मागील महिन्यापर्यंत मिनिमातानगरात राहत होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोशन काही काळापासून राजाच्या विवाहित बहिणीला त्रास देत होता. तो त्याच्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा दावा करीत होता. परंतु राजाची बहिणीने त्याचा इन्कार केला होता. त्यामुळे दोन्ही परिवारात तणाव सरु होता. महिनाभरापासून रोशन वाठोडात राहायला गेला होता. त्यानंतरही त्याचे मिनिमातानगरात येणे-जाणे सुरु होते. गुरुवारी रात्री रोशन राजाच्या बहिणीच्या घरी पोहोचला. तो दरवाजातून आत जात होता. त्याला पाहून राजाच्या बहिणीने आरडाओरड केली. राजा तेथे पोहोचला. रोशनला पाहून तो संतापला. त्याने रोशनशी वाद घातला. राजाला त्याच्या बहिणीने शांत केले. त्यावर रोशन तेथून निघुन गेला. राजाने ही घटना आकाश मेहताला सांगितली. आकाश राजाच्या बहिणीचा नातेवाईक आहे. दोघांनी रोशनला धडा शिकविण्याचे ठरविले. दोघांनी रोशनचा तपास सुरु केला. काही वेळानंतर रोशन त्यांना सापडला. त्यांनी चाकुने वार करून त्याचा खुन केला. घटनेची माहिती मिळताच कळमनाचे ठाणेदार विश्वनाथ चव्हाण घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रोशनला मेयो रुग्णालयात पोहोचविले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून राजाला अटक केली. रोशनच्या कुटुंबात पत्नी, दोन मुली, एक मुलगा आहे. त्याला राजा संतापलेला असल्याची माहिती होती. तरीसुद्धा त्याने आपल्यावर संकट येईल हे ओखळले नाही.