आई-वडील, भावाच्या हत्येसाठी दिले ६५ लाख; मालमत्तेसाठी सख्खा भाऊ झाला वैरी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 06:37 AM2024-04-24T06:37:29+5:302024-04-24T07:14:17+5:30
हत्येदरम्यान घरातून दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेली नव्हती.
गदग : कर्नाटकातील गदग पोलिसांनी १९ एप्रिल रोजी झालेल्या चार खुनांच्या गुन्ह्याचा तत्काळ छडा लावला आहे. आई-वडील आणि भाऊ कार्तिक बकाले यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांना ६५ लाख रुपयांची सुपारी देणाऱ्या विनायक बकालेसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
विनायकचे आई-वडील वाचले पण भाऊ कार्तिक (२७) याच्यासह लग्नासाठी आलेले परशुराम हादिमानी (५५), लक्ष्मी हादिमानी (४५) आणि आकांक्षा (१६) या नातेवाईकांची हत्या करण्यात आली. कार्तिक हा भाजपचे नेते प्रकाश बकाले आणि सुनंदा बकाले यांचा मुलगा होता. हत्येदरम्यान घरातून दागिने, मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरीला गेली नव्हती. त्यामुळे या मागे दरोडा नसून आणखी काहीतरी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करत तपास सुरू केला होता.
दोन जुळे भाऊही हत्येत झाले सहभागी
पोलिस महानिरीक्षक (उत्तर विभाग) विकास कुमार यांनी सांगितले की त्यांनी विनायक बकाले (३५), फिरोज खाझी (२९), जिशान खाझी (२४) यांना गदग येथून अटक केली आहे, तर जुळे भाऊ साहिल अशफाक खाझी (१९), सोहेल अशफाक खाजी (१९) यांच्यासह सुलतान जिलानी शेख (२३), महेश जगन्नाथ साळुंके (२१) आणि वाहीद लियाकत बेपारी (२१) यांना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज येथून अटक करण्यात आली आहे. विनायकने फिरोजला मारण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी दिली होती.
नेमके काय झाले?
या हत्येमागे भावांमधील मालमत्तेचा वाद असल्याचा संशय आहे. प्रकाश यांना त्यांची सर्व मालमत्ता कार्तिकला द्यायची होती, त्यामुळे विनायकला राग आला होता. या रागातूनच त्याने आईवडील आणि भावाला संपवण्याचा निर्णय घेतला.