भावांनी केली बहिणीला त्रास देणाऱ्याची हत्या; अपहरण करून मृतदेह उल्हास नदीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 10:06 AM2023-08-06T10:06:22+5:302023-08-06T10:06:40+5:30
कल्याणनजीक टिटवाळा येथे शहबाज शेख राहत होता. त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्याला पहिली बायको आहे. मात्र, त्याचे अन्य एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संबंध होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लिव्ह इन रिलेशनशिप राहणाऱ्या बहिणीला त्रास देणाऱ्याची तीन भावांनी अपहरण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचा मृतदेह उल्हास नदीत फेकून दिला असून, शहबाज शेख असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मात्र, नदीत फेकून दिलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
कल्याणनजीक टिटवाळा येथे शहबाज शेख राहत होता. त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्याला पहिली बायको आहे. मात्र, त्याचे अन्य एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये संबंध होते. या लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेसोबत त्याचे पटत नव्हते. त्याचे वाद होत होते. त्यांची दोघांची भांडणे होत होती. त्या महिलेचे दोन सख्ख्ये भाऊ आणि एक मानलेला भाऊ यांना बहिणीला होत असलेला त्रास सहन झाला नाही. त्यांनी त्याला धडा शिकवण्याचे ठरविले. शुक्रवारी शहबाज बेपत्ता झाला. तो बेपत्ता झाल्याने त्याच्या वडिलांनी खडकपाडा पोलिस ठाणे गाठून शहबाज बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली होती.
खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि पोलिस निरीक्षक शरद जिणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अनिल गायकवाड यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. संबंधित महिलेचे तीन भाऊ इसरार शेख, शोयेब शेख आणि हेमंत बिछवाडे यांना ताब्यात घेतले.
अशी केली हत्या
प्राथमिक तपासात तिघांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी शहबाज याचे अपहरण केले. त्याला एका रिक्षात बसवून निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याच्या डोक्यात हातोडीने जोराचा प्रहार केला. त्याला जिवे ठार मारल्यावर त्याचा मृतदेह उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिला. शहबाज याचा मृतदेह पाेलिसांच्या हाती लागलेला नाही.