चुलत्याच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेपेची शिक्षा; सामाईक जमीन वाटपावरून वाद!
By दत्ता यादव | Published: January 25, 2024 11:23 AM2024-01-25T11:23:23+5:302024-01-25T11:32:25+5:30
दुधेबावी, ता. फलटण येथे ४ जुलै २०२० रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती.
सातारा : सामाईक जमीन वाटून देत नसल्याच्या कारणावरून चुलत्याचा खून केल्याप्रकरणी दुधेबावी, ता. फलटण येथील सख्ख्या भावांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांनी जन्मठेप व प्रत्येकी तीन लाख रुपये दंड व दंड न दिल्यास एक वर्ष साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.अनिकेत हणमंत सोनवलकर (वय २३), शंभूराज हणमंत सोनवलकर (२१), अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
दुधेबावी, ता. फलटण येथे ४ जुलै २०२० रोजी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. सामाईक जमिनीचे वाटप करून देत नाही, या कारणावरून ज्ञानदेव महादेव सोनवलकर (४०, रा. दुधेबावी) यांना भाऊ हणमंत, भावजय सुनीता सोनवलकर यांनी शिवीगाळ करून पाइपने मारहाण केली होती. तसेच पुतण्या अनिकेतने कुऱ्हाडीने त्यांच्या दंडावर वार केला होता तर, शंभूराज याने डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली होती. यामध्ये ज्ञानदेव यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन सावंत, उपनिरीक्षक यू. एस. शेख यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने अनिकेत आणि शंभूराज या दोघा भावांना जन्मठेप व प्रत्येकी तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतील पाच लाख रुपये ज्ञानदेव यांच्या कुटुंबीयांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
सरकार पक्षातर्फे सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी काम पाहिले. पोलिस उपअधीक्षक राहुल धस, फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून साधना कदम व हवालदार बडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाला पोलिस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत, हवालदार मंजूर मणेर, शेख, अमित भरते यांनी सहकार्य केले.
आई-वडील निर्दोष
या खून प्रकरणात अनिकेत आणि शंभूराज यांच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांच्या आई-वडिलांची यातून निर्दोष मुक्तता केली.