युनियन बँकेच्या शिपायाची निर्घृण हत्या, अलिबाग तालुक्यातील घटना
By राजेश भोस्तेकर | Published: March 14, 2023 11:54 PM2023-03-14T23:54:10+5:302023-03-14T23:55:07+5:30
शेतात दुपारच्या सुमारास सापडला मृतदेह
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: मधील युनियन बँक मध्ये शिपाई असलेल्या नथुराम रुपसिंग पवार (४०) याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. अलिबाग तालुक्यातील सहाण पाले बायपास येथील शेतात दुपारच्या सुमारास मृतदेह सापडला आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नथुराम याचा मृतदेह शवविच्छेनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. नथुराम याची हत्या का करण्यात आली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
नथुराम पवार हा अलिबाग मधील युनियन बँकेत शिपाई म्हणून काम करीत होता. शहरातील शास्त्रीनगर येथे तो राहत होता. १३ मार्च पासून तो घरी आला नसल्याने पत्नीने अलिबाग पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलीस नथुराम याचा शोध घेत होते. १४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास सहाण पाले येथे नथुराम याचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडला. याबाबत पोलिसांना सांगितल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. नथुराम याच्या डोक्यावर, पाठीवर, छतीवर कोणत्यातरी हत्याऱ्याने वार केले आहेत. वार वर्मी लागल्याने नथुराम याचा जागीच मृत्यू झाला होता. नथुराम याचा मृतदेह पोलिसांनी पंचनामा करून ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला आहे.
नथुराम याची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली याबाबत कारण अस्पष्ट आहे. अलिबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.