डबल मर्डर… भाजप नेत्यासह पत्नीची हत्या, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले मृतदेह!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 11:16 AM2023-01-31T11:16:55+5:302023-01-31T11:17:19+5:30
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरा शहरात भाजप नेते आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. महेंद्र प्रसाद सिंह व त्यांची पत्नी पुष्पा सिंह यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
भोजपूर : बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात एका दाम्पत्याच्या हत्येची घटना समोर आली आहे. येथील जिल्हा मुख्यालय असलेल्या आरा शहरातील नवादा पोलीस स्टेशन हद्दीतील कटिरा परिसरात अज्ञातांनी एका भाजप नेत्याची आणि त्यांच्या पत्नीची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरा शहरात भाजप नेते आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. महेंद्र प्रसाद सिंह व त्यांची पत्नी पुष्पा सिंह यांची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी ही घटना घडवून आणल्याचे सांगण्यात आले. हल्लेखोरांनी हत्या केल्यानंतर पती-पत्नीचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवले होते.
दरम्यान, ओळखीच्या व्यक्तीने या दोघांची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. भोजपूरचे एसपी प्रमोद कुमार, एएसपी हिमांशू, नवादा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेश रविदास, शहर पोलिस स्टेशनचे प्रभारी संजीव कुमार आणि डीआयओ प्रभारी शंभू कुमार भगत यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी झाले असून तपास सुरू आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
भोजपूरचे एसपी प्रमोद कुमार यादव यांनी सांगितले की, पती-पत्नीचे मृतदेह वेगळ्या खोलीत ठेवण्यात आले होते. घर पाहिल्यावर कोणीतरी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही, बहुधा ओळखीच्या कोणीतरी व्यक्तीने ही घटना घडवून आणली असावी. याचबरोबर, निवृत्त प्राध्यापक दाम्पत्याची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती भाडेकरूने फोन करून दिली. फॉरेन्सिक टीम रीतसर तपास करेल. प्रथमदर्शनी असे दिसते की, मृत्यू कशाचा तरी मार लागल्याने झाला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण कळेल, असेही एसपी प्रमोद कुमार यादव यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांच्याशी मैत्रीचे संबंध
डॉ. महेंद्र प्रसाद सिंह हे भाजपचे नेते होते आणि त्यांचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी मैत्रीचे संबंध होते. डॉ. महेंद्र प्रसाद सिंह हे 1982-83 च्या सुमारास बिहारमधील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा राजनाथ सिंह हे उत्तर प्रदेशातील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते. प्राध्यापक महेंद्र प्रसाद सिंह हे वीर कुंवर सिंह विद्यापीठात पीजी पॉलिटिकल सायन्स विभागाचे विभागप्रमुख आणि विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अध्यक्ष होते.