कवलापूरमध्ये फरशी कामगाराचा निर्घृण खून; हल्लेखोर पसार
By शीतल पाटील | Published: September 26, 2022 09:45 PM2022-09-26T21:45:48+5:302022-09-26T21:46:49+5:30
खूनानंतर हल्लेखोर पसार झाले असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.
सांगली : मिरज तालुक्यात कवलापूर येथे विमानतळाच्या खुल्या जागेत सोमवारी दुपारी चारच्या सुमारास फरशी कामगाराचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. विठ्ठल बाळकृष्ण जाधव (वय ४०, रा. बनशंकरी मंदिराशेजारी बुधगाव) असे मृताचे नाव आहे. खूनानंतर हल्लेखोर पसार झाले असून कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत विठ्ठल जाधव हा बुधगावमधील बनशंकरी मंदिराशेजारी आईसह राहतो. तो फरशी बसविण्याचे कामे करत होता. सोमवारी सकाळी तो कामासाठी घरातून बाहेर पडला होता. नियोजन विमानतळाच्या खुल्या जागेत एकजण रक्ताच्या थोराळ्यात पडल्याचे काही तरुणांना दिसले. त्यांनी तातडीने कवलापूरमधील ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला.
सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विठ्ठल याच्या डोके, कपाळ, तोंड व पायावर धारधार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी पंचनामा करून तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणला. हा खून नेमका कोणी केला, त्या मागचे कारण काय हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. क्षणिक वादातून खून झाल्याची चर्चा आहे. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
घटनास्थळी शहर विभागाचे उपअधीक्षक अजित टिके यांनी भेट दिली. ग्रामीणचे सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, सागर पाटील, अंमलदार रमेश कोळी, संदीप मोरे, कपिल साळुंखे, महेश जाधव तपास करत आहेत. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथकही संशयितांच्या मागावर आहे.
घटनास्थळी रक्ताने माखलेला तांब्या
विमानतळाच्या खुल्या जागेत खूनाची घटना घडल्याची माहिती मिळताच बघ्याची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळी रक्ताने माखलेला तांब्या, बांधकामाचे टेप, चप्पल या वस्तू पोलिसांना मिळून आल्या. विठ्ठल हा अविवाहित होता. त्याच्या दोन्ही बहिणीचा विवाह झाला आहे. तो आईसह बनशंकरी मंदिराशेजारी रहात होता.