पत्नीला छेडणाऱ्या अल्पवयीनाची निर्घृण हत्या, स्वयंपाकघरात दडवले मृतदेहाचे तुकडे, चेंबूरमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:17 IST2023-08-31T06:16:50+5:302023-08-31T06:17:10+5:30
याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी शफिक अब्दुल मजीद शेख (३३) याला अटक केली आहे. ईश्वर पुत्रण असे मृत मुलाचे नाव आहे.

पत्नीला छेडणाऱ्या अल्पवयीनाची निर्घृण हत्या, स्वयंपाकघरात दडवले मृतदेहाचे तुकडे, चेंबूरमधील धक्कादायक प्रकार
मुंबई : पत्नी आणि मेहुणीची छेड काढतो या रागातून रिक्षा चालकाने एका अल्पवयीन मुलाची हत्या करत त्याच्या मृतदेहाचे तुकडे स्वयंपाकघरात ठेवल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी शफिक अब्दुल मजीद शेख (३३) याला अटक केली आहे. ईश्वर पुत्रण असे मृत मुलाचे नाव आहे.
चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत शेख कुटुंबीय राहण्यास आहे. ईश्वर हा पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याचा शेखला संशय होता. वस्तुत: ईश्वर हा त्याच्या पत्नीचा मानलेला भाऊ होता. आधीही शेखने पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याच्या रागात वेळोवेळी ईश्वरला समज दिली होती.
सोमवारी सकाळी शेखने ईश्वरला घरी बोलावून पुन्हा समज दिली. मात्र, त्याने शेखलाच उलट उत्तरे दिली. याच रागात संतापलेल्या शेखने घरातील कोयत्याने ईश्वरच्या डोक्यावर वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे हात, पाय, डोके धडापासून वेगळे करत एका प्लास्टिक पिशवीत भरले. ती पिशवी स्वयंपाक घरातच ठेवली होती.
अखेर सत्य समोर...
शेखच्या सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. ईश्वरला आई-वडील नसल्याने तक्रारदारच त्याचा सांभाळ करत होते.
२८ तारखेला त्यांनी शेखसोबत जाताना ईश्वरला शेवटचे पाहिले होते. त्यानंतर, त्याच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी शेखकडे चौकशी केली.
मात्र, त्याने उत्तर दिले नाही. त्यांनीही पोलिसांकडे मदत मागितली. शेखच्या वागण्याने पत्नीने बुधवारी घरी येण्याचा आग्रह धरला. अखेर, त्याने पत्नीला घटनाक्रम सांगताच तिला धक्का बसला.
पत्नीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. आरसीएफ पोलिसांनी शेखला ताब्यात घेत चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
शेखच्या शेजारच्या इमारतीतच त्याच्या पत्नीचे माहेर आहे. सोमवारी ती माहेरी असताना आरोपीने हत्या केली. त्यानंतर, पत्नीला काही दिवस माहेरीच राहण्याचा सल्ला दिला. पत्नीला संशय आल्याने ती घरी आली. मात्र, शेखने तिला घरात येऊ दिले नाही.