धक्कादायक! मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत ठेवला पोत्यात भरून; सहा हजारांच्या तगाद्यामुळे वृद्ध घरमालकिणीची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:35 PM2021-04-15T20:35:46+5:302021-04-15T20:38:34+5:30
Murder Case : भाडेकरू दाम्पत्यासह दोघे साथीदार ताब्यात
नाशिक : वयोवृद्ध घर मालकिणीकडून थकीत घरभाड्याच्या सहा हजारांची वारंवार होणाऱ्या मागणीचा मनात राग धरून भाडेकरू दाम्पत्याने दोन साथीदारांच्या मदतीने वृद्धेची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना चुंचाळे भागात घडल्याचे गुरुवारी(दि.15) उघडकीस आले.
चुंचाळे येथील दत्तनगर भागातील माऊली चौकात राहणाऱ्या जिजाबाई पांडुरंग तुपे (68) यांच्या मालकीच्या लहान तीन खोल्या एकमेकांना लागून आहे. त्यांनी एका खोलीत निलेश हनुमंत शिंदे (21) व त्याची पत्नी दीपाली नीलेश शिंदे (१९) यांना भाडेकरू म्हणून ठेवले होते. एक लहान खोली रिकामी होती आणि एका खोलीत त्या स्वतः राहत होत्या. सहा हजार रुपये घरभाडे थकल्याने तुपे यांनी शिंदे दाम्पत्याकडे ती रक्कम लवकरात लवकर देण्याचं तगादा लावला होता. यामुळे त्यांच्यात काही दिवसांपूर्वी खटकेही उडाले होते. मुळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या या पती-पत्नीने संगणमताने घरमालकीन तुपे यांच्या हत्येचा कट रचला आणि संशयित मंगेश बाळू कदम (१९) आणि विष्णू अंकुश कापसे (१९, दोघे रा.विल्होळी) यांना काहीतरी आमीष दाखवून बोलावून घेतले. या दोघांच्या मदतीने शिंदे दाम्पत्त्याने तुपे यांचा काटा काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
तुपे यांचा संशयित निलेश त्याची पत्नी दीपाली आणि साथीदार मंगेश, विष्णू यांनी दोरीच्या साह्याने गळा आवळून ठार मारले. यानंतर तुपे यांच्या अंगावरील दागिने काढून घेत त्यांचा मृतदेह छिन्नविछिन्न करत एका पोत्यात भरून रिकाम्या खोलीत डांबून ठेवल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या असून अंबड पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही तासांत खुनाचा उलगडा
वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोत्यामध्ये वृद्ध महीलेचे प्रेत गळ्याला दोरीआवळून टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले.. दरम्यान या खुनाबद्दल आजूबाजूला चौकशी केली असता जिजाबाई यांच्या खोलीत भाड्याने राहणारा भाडेकरू हा मंगळवार (दि.13) हा पत्नीला घेऊन रात्रीपासून फरार झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, किरण गायकवाड, मुकेश गांगुर्डे, हेमंत आहेर यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार अकोले गाठले. तेथून या दोघा पती-पत्नीला ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात आणले. त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच सहा हजारांचा तगादा घरमालकिणीने लागवल्याने त्याचा राग येऊन दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.