क्रूरपणे महिलेची हत्या; अदयाप पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा झाला नसल्याने मोठं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 08:28 PM2021-11-02T20:28:09+5:302021-11-02T20:35:42+5:30
Brutally murdering a woman :नागझरी (बोईसर)इथे राहणारी पूर्वाश्रमीची आरती चिंतामण अधिकारी ह्या दुर्दैवी महिलेचे लग्न जानेवारी 2019 रोजी खारेकुरण येथील मनीष पाटील (वय 36 वर्ष)ह्यांच्याशी झाले होते.
हितेंन नाईक
पालघर - खारेकुरण देसले पाडा येथे राहणाऱ्या आरती मनीष पाटील(वय 33 वर्ष)ह्या महिलेचा अत्यंत निर्घृण हत्येप्रकरणी तेजस देसले(वय 22)ह्या तरुणाला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अत्यंत क्रूर आणि निर्घृण हत्येमागचे ठोस कारण मात्र पुढे येत नसल्याने ह्या खूनामागील रहस्य शोधण्याचे आव्हान पालघरपोलिसांपुढे उभे आहे.
नागझरी (बोईसर)इथे राहणारी पूर्वाश्रमीची आरती चिंतामण अधिकारी ह्या दुर्दैवी महिलेचे लग्न जानेवारी 2019 रोजी खारेकुरण येथील मनीष पाटील (वय 36 वर्ष)ह्यांच्याशी झाले होते. परंतु लग्नानंतर काही दिवसानंतर तिचे सासरी खटके उडू लागल्याने ती आपल्या माहेरी निघून आली होती.त्यानंतर पती मनीष पाटील आणि त्याच्या नातेवाईकांच्या मध्यस्थी नंतर आरती आपल्या सासरी नांदावयास आली होती.मात्र तिचा त्रास काही कमी होत नसल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. शनिवारी आरती हरवल्याची तक्रार तिच्या सासरच्या मंडळींनी पालघर पोलीस ठाण्यात केली होती.त्यानंतर सोमवारी तिचा मृतदेह त्याच्या घरापासून काही अंतरावरील शेतात आढळून आला.तिच्या डोक्यात दगड घालून आणि शरीरावर अन्य मोठ्या प्रमाणात वार करण्यात आल्याने अत्यंत क्रूरपणे हा खून करण्यात आल्याचे मृत महिलेच्या नातेवाईकांनी पत्रकारांना सांगितले.
हा पूर्व नियोजित आणि संगनमताने हा खून करण्यात आल्याचा आरोप ही केला जात असून तिच्या पती सह सासरच्या मंडळींवर संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात भादंवी कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भालसिंग ह्यांनी सांगितले.