रावेतमध्ये बिल्डरकडून ग्राहकाची ४७ लाख ८० हजारांची फसवणूक : गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 03:01 PM2019-07-31T15:01:43+5:302019-07-31T15:03:08+5:30
फ्लॅट देतो म्हणून एका वीट कारखानदाराचे सव्वा तीन वर्षांपूर्वी ४७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.
देहूरोड : रावेत येथे फ्लॅट देतो असे म्हणून एका वीट कारखानदाराचे सव्वा तीन वर्षांपूर्वी ४७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश पुंडलिक शिरूडे ( भूमी क्रियेशन , रावेत ) याच्याविरुद्ध देहूरोड पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महेश शिवाजी राऊत (रा.पाटील वस्ती, मामुर्डी, देहूरोड , पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.
देहूरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फियार्दी महेश राऊत यांचे वीट व्यवसायानिमित्त भूमी क्रियेशनचे मालक सुरेश शिरूडे यांची ओळख झाली. रावेत येथील भूमी ओराबेल येथे दिड व दोन बीएचके असे दोन वेगवेगळे फ्लॅट स्वस्तात देतो असे म्हणून राऊत यांना बांधकाम साइटवर बोलावून विश्वास संपादन करून सव्वा तीन वर्षांपूर्वी सुमारे ४७ लाख ८० हजार रुपये बँकेतून ट्रान्सफर करून दिले असून राऊत यांना अद्यापपर्यंत फ्लॅट न दिल्याने झालेल्या फसवणुकी प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात राऊत यांनी गुन्हा दाखल केला आहे .याप्रकरणी अधिक तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चौधरी करीत आहेत.