संपत्तीच्या हव्यासापोटी बिल्डर पतीचा खून, पत्नीसह प्रियकराला ठाेकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 07:47 AM2024-01-16T07:47:02+5:302024-01-16T07:47:11+5:30
मनोजकुमार यांच्यावर गुन्हे असल्याने या गुन्ह्यात त्यांची संपत्ती जप्त होईल, अशी भीती पत्नी पूनमला होती.
नवी मुंबई : सीवूड येथे झालेल्या बिल्डरच्या हत्येचा उलगडा करण्यात एनआरआय पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात पत्नीला व तिच्या प्रियकराला बेड्या ठाेकण्यात आल्या आहेत. बिल्डराचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याने त्याची संपत्ती कधीही जप्त होण्याची भीती असल्याने या दोघांनी हे हत्याकांड केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सीवूड सेक्टर ४४ येथील बिल्डर मनोजकुमार सिंग (३९) याची शनिवारी हत्या झाली होती. कार्यालयात त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर या घटनेनंतर नवी मुंबईत खळबळ उडाली. मनोजकुमार याच्यावरही फसवणुकीचे सहा गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हत्येमागे आर्थिक वादाचे कारण आहे का? असा प्रश्न तपासादरम्यान निर्माण झाला होता. मात्र, या हत्येमागे सिंग यांचाच कामगार व पत्नी असल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे.
त्यानुसार दोघांना अटक केली आहे. सिंगच्या कार्यालयात काम करणारा राजू ऊर्फ शमसूल अबुहुरेरा खान (२२) याच्यासोबत पत्नी पूनम सिंगचे प्रेमसंबंध होते, असे उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तपास करणाऱ्या एनआरआय पोलिसांना राजूवर संशय आल्याने त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात आली.
सीसीटीव्हीच्या डीव्हीआरचा शोध सुरू
मनोजकुमार यांचा मृतदेह आढळल्यानंतर रात्री कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी के. कुमार नावाची व्यक्ती भेटायला येणार होती, असे पत्नी पूनम यांनी पोलिसांना कळवले होते. मात्र, त्यांचा यामध्ये अद्याप सहभाग उघड झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले; परंतु हत्येच्या घटनेनंतर मनोजकुमार यांच्या कार्यालयातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांना मिळाला नाही. तो मिळाल्यानंतर हत्येचे चित्र स्पष्ट होणार असून तो मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
मनोजकुमार यांच्यावर गुन्हे असल्याने या गुन्ह्यात त्यांची संपत्ती जप्त होईल, अशी भीती पत्नी पूनमला होती.
राजूच्या मदतीने कट रचला. सिंग कार्यालयात असताना त्याच्या डोक्यात रॉड मारून हत्या करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त पानसरे यांनी सांगितले.