पत्नीनेच केले बिल्डर पतीचे फिल्मी स्टाईलने अपहरण; पोलिसांनी केली ३६ तासांत सुटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 10:41 PM2021-11-08T22:41:16+5:302021-11-08T22:41:52+5:30

न्हावा-शेवा पोलिसांनी पाठलाग करत गोव्यातून केली  सुटका : पत्नीसह सात आरोपींना अटक

builder kidnaps husband in film style by wife Police released him within 36 hours | पत्नीनेच केले बिल्डर पतीचे फिल्मी स्टाईलने अपहरण; पोलिसांनी केली ३६ तासांत सुटका 

पत्नीनेच केले बिल्डर पतीचे फिल्मी स्टाईलने अपहरण; पोलिसांनी केली ३६ तासांत सुटका 

googlenewsNext

मधुकर ठाकूर

उरण : प्रॉपर्टीच्या वादातून व पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेसोबत मौजमजा करणाऱ्या पतीलाच संतप्त झालेल्या पत्नीनेच सहकाऱ्यांच्या मदतीने  फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याची घटना न्हावा- शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ३६ तासातच शिताफीने तपास करीत गोव्यातुन तीन महिलांसह पाच इसमांना अटक  करुन अपहरण झालेल्या पतीची पोलिसांनी सुखरूपपणे सुटका केली आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजयाराजन चेट्टीयार ( ४५) हे मुळचे तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहेत.विजय राजन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी असून नवी मुंबई सीवुड येथे त्यांचे कार्यालय आहे.तसेच नवीमुंबईतच ते मागील काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत.त्याची विवाहित पत्नी अलगु मिनाक्षी विजयाराजन चेट्टीयार तामिळनाडू येथेच वास्तव्यास आहे.पती-पत्नीत छोट्या मोठ्या गोष्टींसाठी व मालमत्तेसाठी वादविवाद होत होते.पती-पत्नीत बेबनाव निर्माण झाल्याने अखेर त्यांनी तामिळनाडू येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.घटस्फोटाच्या अर्जावर अद्यापही न्यायालयाने निकाल दिलेला नाही.

मात्र मालमत्तेचा वाद संपुष्टात आलेला नसतानाही आणि घटस्फोटाचा न्यायालयात खटला सुरू असतानाही विजयाराजन चेट्टीयार हे नवीमुंबईत एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहात आहेत.एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहात असल्याची कुणकुण पत्नी अलगु मिनाक्षी यांना लागली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीनेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पतीचेच अपहरण करून अद्दल घडवण्यासाठी कट रचला.

पत्नी अलगु मिनाक्षी हिने नवी मुंबई गाठली.आपल्या दोन महिला सहकारी नागेश्वरी मुरुगन आसारी आणि
रिहाना अन्सर भाषा यांना मालमत्ता खरेदी करण्याच्या नावाखाली बनावट गिऱ्हाईक बनवून पती विजयाराजन चेट्टीयार यांच्या सीवूड येथील कार्यालयात पाठविण्यात आले. प्रापर्टी दाखविण्यासाठी विजयाराजन हे उलवे येथील खारकोपर येथे दोन महिलांना घेऊन आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अपहरणकर्त्यांनी दोन महिलांच्या मदतीने बिल्डर्स विजयाराजन यांचे अपहरण करून गोव्याच्या दिशेने गाडीतून पलायन केले.

ऑफिस बंद होण्याची वेळ झाली तरी  विजयाराजन परतले नाहीत. तसेच उशिरापर्यंत घरी परत न आल्याने अखेर दुसऱ्या दिवशी न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या अपहरणाची तक्रार दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी सपोनि एस.बी निकम, पोलिस हवालदार व्हि.व्ही. शिंदे,वैभव शिंदे, पोलिस नाईक संजय सपकाळ, गणेश सांबरे, विकास जाधव आदी सहकाऱ्यांसह दोन पथके तयार करून घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.

परिसरातील सीसीटीव्हीच्या टिव्हीचे फुटेज तपासताना बोलेरो जीपमधून विजयाराजन यांचे अपहरण झाल्याची माहिती पुढे आली.विजयाराजन यांचा मोबाईल नंबरवरुन मिळालेले लोकेशन आणि तांत्रिक बाबींचा आधार घेऊन केलेल्या तपासात अपहरणकर्ते पिडीत व्यक्तीला कलिगुंट-गोवा येथे घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. न्हावा-शेवा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेळ न दवडता खासगी वाहनाने लागलीच गोवा गाठले.तेथूनही निसटण्याच्या तयारीत असलेल्या अपहरणकर्त्यांचा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग केला.पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने निघालेल्या अपहरणकर्त्याची जीप कणकवली पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी थांबताच पोलिस पथकांनी अपहरणकर्त्यांवर झडप घालून जेरबंद केले.गाडीत बांधून ठेवलेल्या पीडिताचीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून शिताफीने सुटका केली.याप्रकरणी अवघ्या३६ तासातच पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले असल्याची माहिती वपोनि मधुकर भटे यांनी दिली.पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचे वरिष्ठांसह परिसरातुनही कौतुक केले जात आहे.

Web Title: builder kidnaps husband in film style by wife Police released him within 36 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.