ठाकुर्लीतील बिल्डरला ५६ लाखांचा घातला गंडा, पैशांच्या पावसाचे दाखवले प्रलोभन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 12:27 PM2022-06-27T12:27:13+5:302022-06-27T12:27:55+5:30
ठाकुर्ली पूर्वेतील चोळेगाव परिसरात राहणारे सुरेंद्र पांडुरंग पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. कल्याण-शीळ मार्गालगतच्या त्यांचे दावडी गावातील पाटीदार भवननजीक श्री एकविरा स्वप्ननगरी बिल्डींग नं. ३ येथे कार्यालय आहे.
डोंबिवली : ५० कोटी रुपयांचा पाऊस पडतो, असे प्रलोभन दाखवून एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ५६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघा जणांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती असून पोलिसांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे. लवकरच आरोपींना अटक करू, असा दावा त्यांनी केला आहे.
ठाकुर्ली पूर्वेतील चोळेगाव परिसरात राहणारे सुरेंद्र पांडुरंग पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. कल्याण-शीळ मार्गालगतच्या त्यांचे दावडी गावातील पाटीदार भवननजीक श्री एकविरा स्वप्ननगरी बिल्डींग नं. ३ येथे कार्यालय आहे.
गणेश, शर्मा गुरुजी, अशोक गायकवाड, महेश, रमेश मोकळे या पाच जणांनी सुरेंद्र यांना शनिवारी तुमच्या कार्यालयात ५० कोटींचा पाऊस पाडून देतो, असे प्रलोभन दाखविले. मात्र, त्यासाठी पूजा घालावी लागेल. परंतु, पूजा मोठी असल्याने त्यासाठी तुम्हाला ५६ लाख रुपये खर्च करावे लागतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.
गुन्हा केला दाखल
- पाच जणांनी पैसे आणण्यास सुरेंद्र यांना सांगितले.
- पैसा पाडण्याच्या निमित्ताने कार्यालयात सकाळी ८ वाजता पूजेचा घाटही घालण्यात आला.
- पूजा झाल्यावर इमारतीला प्रदक्षिणा मारून येतो, असा बहाणा करून पाचही जणांनी ५६ लाखांच्या रकमेसह पोबारा केला.
- आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
- याप्रकरणी फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्य यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.