२५ लाखांची सुपारी देत बिल्डरची हत्या, चौघांना अटक; गुजरातच्या साई गावातील वाद ठरला कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:51 AM2023-03-21T05:51:55+5:302023-03-21T05:52:14+5:30
मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिस मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहेत.
नवी मुंबई : नेरूळ येथे झालेल्या बिल्डरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. गुजरातमधील साई गावात बिल्डर सवजी मंजेरी यांची असलेली कथित दहशत मोडण्यासाठी व त्यांनी केलेल्या कथित हत्येचा बदल घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या हत्येची २५ लाखांना सुपारी दिल्याचे उघड झाले आहे. मारेकऱ्यांना अटक केल्यानंतर पोलिस मुख्य सूत्रधाराच्या शोधात आहेत.
बिल्डर सवजी मंजेरी (५६) यांची बुधवारी नेरूळ येथे गोळ्या झाडून हत्या झाली होती. नेरूळ पोलिसांना घटनास्थळापासून सुमारे ७०० मीटर अंतरावर संशयित दुचाकी आढळली होती. त्यावरून पोलिसांनी मेहेक नारिया (२८), कौशल यादव (१८), गौरवकुमार यादव (२४) व सोनूकुमार यादव (२३) यांना अटक केली.
मेहेक हा मूळचा गुजरातचा असून, गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी त्याने ओएलएक्सवरून खरेदी करून दिली होती. त्या दुचाकीवरून कौशल व सोनूकुमार याने मंजेरी यांच्यावर पाळत ठेवून कौशलने गोळ्या झाडल्या होत्या.
दुचाकी हाती लागल्यानंतर पोलिसांनी तपासाचा धागा पकडून वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, रवींद्र दौंडकर, निरीक्षक महेश पाटील, सहायक निरीक्षक सचिन ढगे, सत्यवान बिले आदींच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला. मेहेक नारियाला गुजरातमधून ताब्यात घेतल्यानंतर तिघा मारेकऱ्यांची माहिती समोर आली. त्यानुसार दुसऱ्या पथकाने तत्काळ बिहार गाठून कौशल, गौरवकुमार व सोनूकुमार यांना ताब्यात घेतले असून, दोन दिवसांत त्यांना नवी मुंबईला आणले जाणार असल्याचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हत्येनंतर मंदिरात अभिषेक
बुधवारी संध्याकाळी सवजी यांची नेरूळमध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावातील विरोधकांनी तिथल्या मंदिरात अभिषेक केला होता. हा प्रकार तेथील नागरिकांच्या निदर्शनास आला असता त्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनाही मिळाली होती.
नवी मुंबईतील प्रकरणाचा उलगडा
सवजी यांची गुजरातच्या रापर तालुक्यातील साई गावात दहशत होती. त्यांच्यावर १९९८ मध्ये बच्चूभाई पटनी यांच्या हत्येचाही गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्यांची निर्दोष सुटका झाली होती. त्यानंतर सवजी यांनी गावात दरारा निर्माण केला होता. तीन महिन्यांपूर्वी पटनी यांच्याच काही नातेवाइकांसोबत त्यांचा वाद झाला होता. यामुळे सवजी आपला सूड घेणार या भीतीने त्यांच्या हत्येची २५ लाखांची सुपारी दिली. त्यापैकी एक लाख रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले होते.