येरवड्यात जागा बळकावण्यासाठी बिल्डरने रोखले पिस्तुल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 08:31 PM2018-10-19T20:31:23+5:302018-10-19T20:34:51+5:30
पिस्तूलाचा धाक दाखवून गोडाऊन आणि कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करून जागा बळकावल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : पिस्तूलाचा धाक दाखवून गोडाऊन आणि कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त करून जागा बळकावल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद जैन असे बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी विकास भिमसेन नाणेकर (वय ४२, रा. चंदननगर रोड) यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या वडिलांनी १९७३ साली नगररोड येथे ५००० चौरस फुट जागेत भुषण कडबाकुट्टी व १९७७ मध्ये भूषण फायरवूड अॅण्ड स्क्रॅप सेंटर नावाचा व्यवसाय केला. या दोन्ही दुकानांची जागा भाड्याने घेतलेली होती. फिर्यादींच्या वडिलांनी २००४ आजारपणामुळे कडबाकुट्टीचा व्यवसाय बंद केला होता. तर २००४ त २००७ दरम्यान भंगार व्यवसायाच्या परवान्याचे नूतनीकरण केले. या ठिकाणी २००८ मध्ये भूषण फ्रेम नावाने दुकान सुरू करण्यात आले होते. २०१७ साली वडिलांचा मृत्यू झाल्यावर भंगाराचा व्यवसायही फिर्यादी पाहत होत. २५ सप्टेंबर २०१८ रोजी फिर्यादींचा पुतण्या भुषण हा त्याचा मामा सुधीर साकोरे यांच्याकडे रामवाडी येथे जेवायला गेला होता. यानंतर तो रात्री फेरफटका मारण्यासाठी नगररोड येथे आला. त्यावेळी त्याला दुकानाकडे जाणाऱ्या रस्त्याला पत्र्याचे गेट लावून रस्ता अडवलेला दिसला. त्यामुळे तो दुकानाकडे गेला असता तेथे दुकानाचे कुलूप तोडण्याचे काम सुरू होते. तसेच जेसीबीने गोडाऊन तोडून आतील सर्व सामान टेम्पोत भरून चोरण्यात आले. यासंदर्भात तेथे उपस्थित असलेल्या जैन यांना विचारले असता त्यांनी पिस्तूल रोखून चल येथून बाहेर निघ असा दम दिला. तर रमेश आढाव, शाम आढाव गुंड मोईन कुरेशी यांना पुतण्याला येथून बाहेर काढण्यास सांगितले. त्यानंतर हे सर्व हत्यार घेऊन पुतण्याच्या दिशेने धावुन आले. त्यामुळे भूषण यांनी पळ काढून घर गाठले. दूसऱ्या दिवशी तेथे जाऊन पाहणी केली असता गोडाऊन व कार्यालय जमीनदोस्त झाल्याचे आढळले. त्यामुळे येरवडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार अर्ज दाखल केला. यानंतर १२ आॅक्टोबर रोजी फिर्यादी पुन्हा व्यवसायाच्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी गेले असता पाच ते सहा व्यक्तींनी धक्का-बुक्की करून त्यांच्यावर गज घेऊन धावले, अशी फिर्याद दिली आहे.