बिल्डरच्या पत्नीला बंदुकीचा धाक दाखवून दाट वस्तीतच दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 10:44 PM2021-02-18T22:44:49+5:302021-02-18T22:45:04+5:30
बुधवार पेठ या दाट वस्तीत अरूण गिरडकर यांनी उभारलेली अरूणोदय २, विमल कॉम्पलेक्सची इमारत आहे. येथे अन्य फ्लॅटधारकांसह स्वत: अरूण गिरडकर पत्नी विमल समवेत वास्तव्याला असतात.
उमरेड : पालिकेचे माजी नगरसेवक तथा बिल्डर्स अरूण गिरडकर यांच्या पत्नीवर अज्ञात चोरट्यांनी बंदुक ताणत दरोडा टाकला. आज गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या थरार नाट्यात बंदुकीच्या धाकावर दोन दरोडेखोरांनी सोन्याचे दागिणे घेत पोबारा केला. विमल अरूण गिरडकर असे महिलेचे नाव असून या संपूर्ण प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बुधवार पेठ या दाट वस्तीत अरूण गिरडकर यांनी उभारलेली अरूणोदय २, विमल कॉम्पलेक्सची इमारत आहे. येथे अन्य फ्लॅटधारकांसह स्वत: अरूण गिरडकर पत्नी विमल समवेत वास्तव्याला असतात. नेहमीच्या सवयीप्रमाणे अरूण गिरडकर हे दुपारी ४ वाजताच्या सुुमारास बाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि वॉक करण्यासाठी गेले. अशातच सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास दोन दरोडे त्यांच्या राहत्या घरात शिरले. दोघांपैकी एका दरोडेखोराने विमल गिरडकर यांच्यावर बंदुक ताणली. दुसºयाने त्यांचे हात रूमालाने बांधले. अशातच तुम्हाला जे हवे आहे ते घेवून जा पण मला मारू नका अशा शब्दात विमल यांनी दरोडेखोरांना विनवणी केली. दरोडेखोरांनी गळ्यातील सुमारे दोन तोळ्याचा गोप, दोन तोळ्याचे मंगळसुत्र आणि बेनटेक्सच्या बांगड्या आणि नगदी अंदाजे दोन हजार रूपये असा एकूण दोन लाख रूपयांचा मुद्देमाल हिसकावत पोबारा केला. विमल गिरडकर यांनी लागलीच शेजारच्यांना घटनाक्रम सांगीतला. पती अरूण गिरडकर यांच्याही कानावर घटनाक्रम सांगीतला. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या नेतृत्त्वात पोलीस कर्मचारी तातडीने पोहोचले. दोन्ही दरोडेखोरांचा संवाद मराठीत होता. अंदाजे ३५ वयोगटातील असलेल्या या चोरट्यांनी डोक्यावर टोपी आणि पांढरा रूमाल बांधून होते, अशीही माहिती यावेळी विमल गिरडकर यांनी दिली.