झटपट न्याय! 9 सुनावण्यात कोर्टाने दिला निकाल, प्रेयसीची हत्या करणाऱ्याला 'आजन्म सश्रम कारावास'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:03 PM2024-08-28T12:03:22+5:302024-08-28T12:06:38+5:30
Latest Court Verdict: खलनायक बघून आरोपीने प्रेयसीची हत्या केल्याची घटना घडली. आरोपीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने आरोपपत्र दाखल केले आणि कोर्टाने मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
Girl Murder Case Latest News: प्रेमात धोका दिल्याच्या रागातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या आरोपीला कोर्टाने मरेपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्हा न्यायालयाने अवघ्या ९ सुनावण्यांमध्येच कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले आणि निकाल दिला. कोर्टाने आरोपीला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने खलनायक चित्रपटातील बल्लूच्या भूमिका बघून हे कृत्य केल्याचे सुनावणी दरम्यान समोर आले.
आरोपी अदनान ऊर्फ बल्लू याने आसमाची धोका दिल्याच्या रागातून हत्या केली होती. पोलिसांनी वेगाने तपास करत ९ दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर ९ सुनावण्या घेत कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले आणि आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.
स्मशानभूमीमध्ये सापडला होता मृतदेह, प्रकरण काय?
11 जून रोजी बुलंदशहरातील खुर्जा दफनभूमीमध्ये आसमा या महिलेचा मृतदेह सापडला होता. आसमाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात आसमाचा पती सलीमने अदनानवर हत्या केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तक्रारीवरून अदनानविरोधात गुन्हा दाखल केला.
अदनानवर संशय व्यक्त करण्यात आल्याने पोलिसांनी त्यानुषंगाने तपास केला आणि अदनान ऊर्फ बल्लूला अटक केली. आसमाच्या हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांनी जप्त केला.
फिल्मी स्टाईलमध्ये दिली हत्येची कबुली
दरम्यान, घटनेनंतर आरोपी अदनान ऊर्फ बल्लूने माध्यमांसमोर फिल्मी अंदाजात आसमाची हत्या केल्याची कबुली दिली. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
त्या व्हिडीओमध्ये अदनानने म्हटले होते की, "आसमा मला प्रेमात धोका दिला. प्रेमात धोका देण्याची शिक्षा फक्त मृत्यू आहे. आसमाला मी फोन घेऊन दिला. आसमा दुसऱ्या व्यक्तीशी बोलत होती. त्यामुळे तिच्या हत्येचा कट रचला. खलनायकमधील बल्लू पात्राची भूमिका बघून मी हे केले."
प्रत्यक्षदर्शीची साक्ष ठरली महत्त्वाची
पोलीस अधिकारी विजय कुमार शर्मा यांनी सांगितले की, "महिलेची हत्या करताना आरोपीला वहीदन नावाच्या महिलेने बघितले होते. पोलिसांनी साक्षीदाराला कोर्टात हजर केले होते. अदनानने हत्या कशी केली, याचा घटनाक्रम साक्षीदार महिलेने कोर्टात सांगितला. त्यानंतर महिलेची साक्ष आणि पुराव्यांच्या आधारावर जलदगती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि शिक्षा ठोठावली.