बुलढाणा: व्यंकटेश नगरात चोरी; किचनच्या खिडकीतून घुसून तीन-चार लाखांचा मुद्देमाल लंपास

By अनिल गवई | Published: June 14, 2024 01:34 PM2024-06-14T13:34:37+5:302024-06-14T13:35:40+5:30

मुद्देमालात रोख रकमेचाही समावेश, ग्रील कापून शिरले घरात

Buldhana Theft in Venkatesh Nagar Three-four lakh worth of goods were looted by entering through the kitchen window | बुलढाणा: व्यंकटेश नगरात चोरी; किचनच्या खिडकीतून घुसून तीन-चार लाखांचा मुद्देमाल लंपास

बुलढाणा: व्यंकटेश नगरात चोरी; किचनच्या खिडकीतून घुसून तीन-चार लाखांचा मुद्देमाल लंपास

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव, जि. बुलढाणा: स्थानिक शेगाव रोडवरील व्यंकटेश सिटी परिसरातील एका घराच्या किचनचे ग्रील कापून चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीच्या दागीण्यांसह तीन ते चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

प्राप्त माहितीनुसार, शेगाव रोडवरील व्यंकटेश सिटीमध्ये युवा उद्योजक शिवशंकर लगर यांचे दुमजली घर आहे. या घराच्या किचनच्या खिडकीचे ग्रील कापून चोरट्यांनी सुरूवातीला किचनमध्ये आणि त्यानंतर दुसर्या माळ्यावरील लॉकररूमध्ये प्रवेश मिळविला. पेचकच आणि इतर साहित्याचा वापर करून लॉकर मधील सोन्या चांदीच्या दांगीण्यासह तीन ते चार लाखांचा ऐवज लंपास केला. या धक्कादायक प्रकारानंतर शहर पोलीस निरिक्षक प्रवीण नाचनकर, पीएसआय निलेश लबडे, पोहेकॉ गजानन बोरसे, नापोकॉ रविंद्र कन्नर, सागर भगत, संतोष गायकवाड, चालक संजीव धंदरे, गजानन काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्थळ निरिक्षण आणि पंचनामा करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनीही आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे व्यंकटेश सिटीसह परिसरात एकच खळबळ माजली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खिडकीचे ग्रील कापले

कटरच्या साहाय्याने किचनच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या दरम्यान ही धाडसी चोरी केली. घरमालक शिवशंकर लगर बाहेरगावी पुणे येथे असल्यामुळे चोरीचा निश्चित आकडा पोलीसांना समजू शकला नाही.

एक चोरटा सीसी कॅमेऱ्यात कैद

चोरीची घटना सीसी कॅमेर्यात कैद झाली असून, सीसी फुटेजच्या आधारे पोलीस चोरीचा तपास करीत आहेत. गत काही दिवसांपासून शहरातील चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते.

Web Title: Buldhana Theft in Venkatesh Nagar Three-four lakh worth of goods were looted by entering through the kitchen window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.