बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक, माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट उधळला
By भगवान वानखेडे | Published: September 14, 2022 05:11 PM2022-09-14T17:11:09+5:302022-09-14T17:49:49+5:30
Radheshyam Chandak : अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलढाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ९ सप्टेंबर रोजी अटक करुन १३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले.
- भगवान वानखेडे
बुलढाणा : उद्योजक तथा श्रीमंत व्यक्तींचे अपहरण करुन त्यांच्या कुटुंबियांकडून कोट्यवधी रुपये उकळून झटपट श्रीमंत होण्याच्या इराद्याने जिल्ह्यातील बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलढाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ९ सप्टेंबर रोजी अटक करुन १३ सप्टेंबर रोजी रात्री बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलढाणा पोलिसांनी तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी दिली.
शहरातील शेर-ए-अली चौकातील मिर्झा आवेज बेग (२१), शेख साकीब शेख अन्वर(२०),उबेद खान शेर खान(२०) अशी प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही ७ सप्टेंबर रोजी दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी एक एअर गन विकत घेतली. बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तींचे अपहणर करुन कोट्यवधी रुपये कमवायचे असा प्लॅन त्यांचा होता. दरम्यान दिल्ली आयबी या तपास यंत्रणेने संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले. बुलढाणा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देऊन त्यांना बुलढाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी दरम्यान राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांचे भविष्यात अपहरण करण्याचा बेत होता असे त्यांनी पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तिघांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
दिल्ली आयबीने बुलढाण्यातील तिघांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी भविष्यात श्रीमंत तथा उद्योजक,व्यापाऱ्यांचे अपहरण करु असे ठरविले होते. यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती आणि बुलडाणा अर्बनचे राधेश्याम चांडक यांचेही भविष्यात अपहरण करु असे चौकशी दरम्यान सांगितले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
-प्रल्हाद काटकर, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन,बुलढाणा
माझा काेणीही शत्रु नाही, हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती मी पण पाेलीसांकडून घेत आहे त्यानंतर सविस्तर बाेलता येईल?
- राध्येश्याम चांडक, संस्थापक बुलडाणा अर्बन