बॅग न दिल्याने वाइन शॉपच्या कामगारावर गोळीबार; अंबड शहराजवळील मार्डी रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 03:48 PM2023-06-25T15:48:02+5:302023-06-25T15:48:47+5:30

अंबड येथील एका वाइन शॉपवर राधाकिसन पिवळ हे कामाला आहेत. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शॉपमधील रोख रक्कम सेफ्टी तिजोरीत ठेवून त्यांनी दुकान बंद केले.

bullet fired on worker for not handing over bag; Incident on Mardi Road near Ambad city | बॅग न दिल्याने वाइन शॉपच्या कामगारावर गोळीबार; अंबड शहराजवळील मार्डी रस्त्यावरील घटना

बॅग न दिल्याने वाइन शॉपच्या कामगारावर गोळीबार; अंबड शहराजवळील मार्डी रस्त्यावरील घटना

googlenewsNext

अंबड : दुचाकीने निघालेल्या वाइन शॉपवरील कामगाराने बॅग न दिल्याने दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना अंबड शहरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डी रस्त्यावर शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात कामगार राधाकिसन पुंडलिक पिवळ (रा. ५२ रा. किनगाव, ता. अंबड) हे जखमी झाले आहेत.

अंबड येथील एका वाइन शॉपवर राधाकिसन पिवळ हे कामाला आहेत. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शॉपमधील रोख रक्कम सेफ्टी तिजोरीत ठेवून त्यांनी दुकान बंद केले. नंतर दुचाकीने (क्रमांक एम.एच.२१, बीबी. ७०२८) अंबडहून मार्डी रोडने घराकडे निघाले. दुचाकीने जात असताना पाठीमागून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. नंतर राधाकिसन पिवळ यांच्या दुचाकीला थांबवून त्यांच्याकडील बॅग मागितली. बॅग देण्यास नकार दिला असता, त्यातील एकाने बंदूक बाहेर काढून गोळीबार केला.

राधाकिसन पिवळ यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ गोळी लागली. यात ते जखमी झाले. त्यानंतर दोघेही तेथून फरार झाले. राधाकिसन पिवळ हे गावाकडे गेले. त्यांनी गावातील एका डॉक्टराला दाखविले असता, त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठविले. राधाकिसन पिवळ यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच, अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

अपर पोलिस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट
घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, पोलिस उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव, डीवायएसपी चैतन्य कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, सहायक पोलिस निरीक्षक साजिद अहमद, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, आदिनाथ ढाकणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल विष्णू चव्हाण, सतीश देशमुख, दीपक देशपांडे, वंदना पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली.

अंबड ठाण्यात गुन्हा दाखल
राधाकिसन पिवळ यांची प्रकृती चांगली आहे. या प्रकरणी राधाकिसन पिवळ यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक साजिद अहमद हे करीत आहेत.

घटनास्थळी भेट दिली असून, पोलिस यंत्रणा तपास कामी लागली आहे. हल्लेखोरांचा हेतू यासह अन्य बाबींचा तपास करून गुन्हा उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पथके आरोपींच्या माघावर आहेत.
- मुकुंद आघाव, उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबड

Web Title: bullet fired on worker for not handing over bag; Incident on Mardi Road near Ambad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.