पोलिसांसमोर शिवसेनेच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या; पंजाबमध्ये सुधीर सुरी यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 08:58 AM2022-11-05T08:58:27+5:302022-11-05T08:58:32+5:30
पोलिसांनी सांगितले की, सुधीर सुरी यांच्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या.
अमृतसर : पंजाबमधील अमृतसर येथे शिवसेना नेते सुधीर सुरी यांची अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या केली. अमृतसर येथील मजिठा रोड या गजबजलेल्या भागातील गोपाल मंदिरनजीक सुधीर सुरी व त्यांचे कार्यकर्ते एका प्रकरणी निदर्शने करत असताना ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, सुधीर सुरी यांच्यावर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. त्यात गंभीर जखमी झालेले सुरी हे जागीच कोसळले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गँगस्टरच्या हिटलिस्टवर असलेल्या सुधीर सुरींच्या सुरक्षेसाठी पंजाब सरकारने आठ पोलीस कर्मचारी तैनात केले होते. या हत्येच्या घटनेबद्दल पंजाब भाजपचे अध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी म्हटले आहे की, पंजाबमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत, हे सुरी यांच्या हत्येमुळे सिद्ध झाले आहे.