Bulli Bai App Case: १८ वर्षीय युवतीनं रचलं १०० मुस्लीम महिलांविरोधात षडयंत्र; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 08:46 AM2022-01-05T08:46:04+5:302022-01-05T08:46:38+5:30
उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमधून १८ वर्षीय आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. ती १२ वीच्या वर्गात शिकते.
मुंबई – सोशल मीडियावर सक्रीय १०० मुस्लीम महिलांविरोधात षडयंत्र रचणाऱ्या आरोपी मुलीला ताब्यात घेतलं आहे. ही मुलगी उत्तराखंडची राहणारी आहे. क्राईम ब्रांच तिला ताब्यात घेऊन मुंबईला आणत आहे. आरोपी युवतीसोबत तिचा सहकारी विशाल कुमार हादेखील या षडयंत्रात सहभागी होता. आरोपी युवतीचं वय अवघं १८ वर्ष आहे तर विशाल कुमारचं वय २१ वर्ष आहे.
आरोपी मुलगी आणि तिच्या मित्राने बुल्ली बाई अॅपच्या माध्यमातून मुस्लीम महिलांविरोधात अपमानास्पद आणि अश्लिल गोष्टी पसरवल्या होत्या. मुस्लीम महिलांची बोली लावण्याचं कृत्य केले गेले. पोलीस या युवतीच्या सहकारी मित्रालाही बंगळुरुहून मुंबईला आणत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमधून १८ वर्षीय आरोपी मुलीला ताब्यात घेतले आहे. ती १२ वीच्या वर्गात शिकते. मुंबई क्राईम ब्रांचने तिला अटक करत स्थानिक न्यायालयात हजर केले. त्याठिकाणी आरोपी युवतीला ट्रांजिट रिमांडमध्ये ठेवत टीम मुंबईसाठी रवाना झाली. बुधवारी टीम मुंबईला पोहचेल.
या षडयंत्रात सहभागी असलेला आरोपी विशाल कुमारला बंगळुरूहून अटक केली. तो २१ वर्षीय इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. विशाल हा मुख्य आरोपी युवतीचा सहकारी मित्र आहे. उत्तराखंडमध्ये राहणारी युवती आणि विशाल दोघंही एकमेकांना पहिल्यापासून ओळखत होते. दोघंही फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मित्र आहेत. त्यामुळे पोलीस तपासात दोघांची लिंक शोधण्यात पोलिसांना लगेच यश आलं. या प्रकरणात अटक आरोपी विशाल कुमारला मुंबई पोलिसांनी बंगळुरूत कोर्टात हजर केले. त्याठिकाणी १० जानेवारीपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांना बुल्ली बाई अॅपच्या ठिकाणांचा शोध घेण्याची परवानगी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रसिद्ध मुस्लीम महिलांचे फोटो गिटहब नावाच्या ऑनलाईन Appवर अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याने देशभरात एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतील एका महिलेने अशाप्रकारे प्रसिद्ध केलेले फोटो ट्विटरवर शेअर केले. त्यानंतर, हा प्रकार समोर आला. या महिलेने दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार केली. हाच मुद्दा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी उचलून धरत मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणीदेखील केली होती.