बंटी-बबलीने सोनारांना घातला लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 12:01 AM2019-08-26T00:01:31+5:302019-08-26T00:01:59+5:30
दोघांना फसवले : व्यापारी असल्याची बतावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : बंटी-बबलीच्या एका जोडीने दोघा सोनारांना दोन लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दीनदयाळ रोड परिसरात राहणाऱ्या भूपेश जैन (३७) यांचे पूर्वेतील आयरे रोड परिसरात रुचिता ज्वेलर्स नावाचे सोनेचांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. २६ जून रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास जैन दुकानामध्ये बसले होते, तेव्हा एक दाम्पत्य त्यांच्या दुकानात आले. त्याच्यातील पुरुषाने त्याचे नाव प्रेम ढिल्लोड असे सांगत, त्याचा भिवंडी येथे कपड्याचा कारखाना असल्याचे जैन यांना सांगितले. सोबत असलेल्या त्याच्या पत्नीचे नाव प्रमिला असल्याचे सांगितले. ढिल्लोड दाम्पत्याला सोन्याचे दागिने विकत घ्यायचे असल्याने, जैन यांनी दुकानातील विविध सोन्याचे दागिने दाखवायला सुरुवात केली. त्या दोघांनी जैन यांच्या दुकानातून मंगळसूत्र, दोन अंगठ्या, कानांतील रिंग, एक नथनी आणि एक पेण्डल असे सुमारे एक लाख ७० हजार रुपयांचे दागिने खरेदी केली. त्यानंतर, ढिल्लोड दाम्पत्याने त्यांच्याकडे रोख रक्कम नसल्याचे सांगत जैन यांना त्यांच्या बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे रक्कम जमा करतो, असे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार जैन यांनी ढिल्लोड याला सर्व माहिती दिली. थोड्या कालावधीनंतर ढिल्लोड दाम्पत्य पुन्हा दुकानात आले आणि त्यांनी सदरची रक्कम आरटीजीएसद्वारे पाठवल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून जैन यांनी ढिल्लोड दाम्पत्याला दागिने दिले. परंतु, पैसे जमा न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना समजले.
मे महिन्यातही लुबाडले
भीमसिंग कडेचा यांनाही अशाच स्वरूपाने फसवत त्यांच्या कावेरी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानातून ढिल्लोड दाम्पत्याने ८ मे रोजी सुमारे ५४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.