अपघाताचा बनाव करून लुटणाऱ्या बंटी बबलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 08:57 PM2023-03-24T20:57:00+5:302023-03-24T20:57:12+5:30
APMC पोलिसांची कारवाई, दुचाकीवरून कट मारून अडवायचे अवजड वाहन
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : दुचाकीला कट मारल्याचा बहाणा करून अवजड वाहनांना अडवून चालकांना लुटणाऱ्या बंटी बबलीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही व्यसनाच्या आहारी गेले असून अनेक दिवसांपासून ते अशाप्रकारे लूटमार करत होते. मात्र बहुतांश वाहनचालक राज्याबाहेरील असल्याने ते तक्रार करत नसल्याने त्यांचे कृत्य दडपले जात होते. मात्र चार दिवसांपूर्वी कोपरी येथे एका टेम्पो चालकाला लुटले असता त्याने दिलेल्या तक्रारीवरून हा प्रकार समोर आला असता पोलिसांनी जोडीचा शोध घेऊन अटक केली आहे.
उद्योग व्यवसाय निमित्ताने विविध राज्यातील अवजड वाहने नवी मुंबईतून ये जा करत असतात. अशा वाहनांच्या चालकांना लुटणारे जोडपे मागील काही दिवसांपासून नवी मुंबईत सक्रिय झाले होते. त्यांच्याकडून दुचाकीवरून एखाद्या अवजड वाहनाला कट मारला जायचा. त्यानंतर त्या वाहनाला काही अंतरावर अडवून कट का मारला ? यावरून भांडण घालत माझ्यावर हात टाकल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करते अशी धमकी तरुणीकडून दिली जायची. त्यामुळे चालक भयभीत झाल्यास त्याच्याकडील रोकड, मोबाईल लुटून दोघेही पळून जायचे. मागील काही त्यांनी शहरात ठिकठिकाणी अशा प्रकारे अनेकांना लुटले आहे. परंतु लुटले गेलेले चालक राज्याबाहेरील असल्याने वेळेअभावी ते तक्रार देत नव्हते. मात्र काही चालकांकडून पोलिसांना या टोळीची चाहूल लागली होती.
त्यातच २० मार्चला कोपरी येथे तुषार खेबडे या टेम्पो चालकाला या टोळीने अपघाताचा बनाव करून लुटले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ निरीक्षक तनवीर शेख यांनी निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक वसीम शेख, निलेश शेवाळे, हवालदार सुनील पाटील, चंद्रकांत कदम, अमर बेलदार आदींचे पथक केले होते. या पथकाने सीसीटीव्ही अथवा इतर माध्यमातून संशयित दुचाकीची माहिती मिळवली होती. मात्र त्यावर नंबरप्लेट नसल्याने ती शोधण्यात अडथळा येत होता. अखेर गुरुवारी ग्रीन पार्क झोपड्पट्टीलगत अमली पदार्थाच्या शोधात एक मुलगा व मुलगी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून तपास पथकाने त्याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले असता, चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानुसार सागर पाटील (२१) व अर्पिता पवार (२०) या दोघांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही रबाळे गाव परिसरातले असून व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल देखील चोरीची असल्याची शक्यता आहार. खर्चासाठी व नशेसाठी पैशाकरिता ते ट्रक, टेंम्पो व इतर अवजड वाहन चालकांना अपघाताच्या बहाण्याने अडवून विनयभंगाच्या गुन्ह्यात अडवण्याची भीती दाखवून लुटत होते. त्यांनी महिन्याभरात अनेकांना लुटल्याची शक्यता आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ मार्च पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.