वारजे माळवाडीत घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा पोलीस मार्शलवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 03:54 PM2020-08-12T15:54:49+5:302020-08-12T15:55:20+5:30
घातक शस्त्रासह दोघांना अटक
पुणे : घरफोडी करत असताना गस्तीवरील पोलीस पकडण्यास गेल्यावर त्यांच्यावर चोरट्याने चाकूने हल्ला करण्याचा प्रकार वारजे माळवाडी येथील जिजाऊ गार्डन येथे मध्यरात्री घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना घातक शस्त्रासह पकडले आहे.
सागरसिंग कालुसिंग जुन्नी (वय २७, रा. वैदुवाडी, हडपसर), जलासिंग जर्मनसिंह जुन्नी (वय ३५, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पोलिसांच्या रेकार्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा १ लाख ४८ हजार २१७ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस मार्शल हे रात्री गस्त घालत होते़ यावेळी आंबेडकर चौकाजवळील जिजाई गार्डन येथील साईराम व्हिला सोसायटीत दोन चोरटे घरफोडी करीत असल्याचा फोन तेथील रहिवाशांनी केला़ त्याबरोबर बीट मार्शल तातडीने तेथे पोहचले़ त्यावेळी चोरटे चोरी करुन पळून जाण्याच्या तयारीत होते़ पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा त्यांच्यातील एका चोरट्याने मार्शलवर सुऱ्याने हल्ला केला़ सुदैवाने मार्शल पूर्ण तयारीत असल्याने तो सुरा त्यांच्या रेनकोटला लागून रेनकोट फाटला़ पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडे कटावणी, स्कु ड्रायव्हर, सुरा अशी घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, चोरी अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक येवले अधिक तपास करीत आहेत.