उल्हासनगरात वृद्ध डॉक्टरांच्या घरी चोरी; १ लाख रोख रक्कमेसह १६ लाख ७५ हजाराचा ऐवज लंपास
By सदानंद नाईक | Published: May 27, 2024 06:30 PM2024-05-27T18:30:43+5:302024-05-27T18:30:51+5:30
दोन तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून व डोक्यावर टोपी घालून चोरी केल्याचे उघड झाले
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील सतरामदास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या वृद्ध डॉक्टरांच्या घरी शनिवारी चोरी झाली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर पूर्वेतील सतरामदास हॉस्पिटल बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर ७५ वर्षाच्या डॉ शालिनी पमनानी ह्या एकट्याच राहतात. त्यांची दोन्ही मुले परदेशात राहत असून त्याच्यावर हिंदुजा हॉस्पिटल मध्ये आठवड्यातून एक दिवस उपचार घ्यावे लागते. शनिवारी सकाळी टॅक्सीने मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल मध्ये गेल्या होत्या.
मुंबई वरून परत आल्यावर घराचा कडीकोयंडा तुटलेला दिसल्यावर त्यांनी घरात प्रवेश केल्यावर कपाटातील १ लाख रुपये रोख रक्कमेसह हिरे, सोन्याचे दागिने असे एकून १६ लाख ७५ हजाराचे दागिने चोरीला गेल्याचे उघड झाले. त्यांनी घरात चोरी झाल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना दिल्यावर, पोलिसांनी चोरीचा गुन्हा अज्ञात दोघांवर दाखल केला. सतराम हॉस्पिटल व वृद्ध महिलेच्या घरा समोरील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले असता, दोन तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून व डोक्यावर टोपी घालून चोरी केल्याचे उघड झाले. पोलीस या अज्ञात चोराच्या मागावर असून विठ्ठलवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.