भिक्षुक महिलेच्या घरी लाखोंची घरफोडी; २४ तासांत चोरटे अटकेत, मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:21 PM2022-11-22T19:21:26+5:302022-11-22T19:23:17+5:30
नालेश्वर नगर येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तनिषा रॉय (३६) या भिक्षुक महिला घर बंद करून रविवारी गेल्या होत्या
नालासोपारा (मंगेश कराळे) - नालेश्वर नगर येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तनिषा रॉय (३६) या भिक्षुक महिलेच्या घरी रविवारी रात्री लाखोंची घरफोडी झाली होती. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून 24 तासाच्या आत तुळींज गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीला अटक करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नालेश्वर नगर येथील अष्टविनायक बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तनिषा रॉय (३६) या भिक्षुक महिला घर बंद करून रविवारी गेल्या होत्या. त्याच रात्री चोरट्यांनी उघड्या खिडकीतून आत हात टाकत बेडवर ठेवलेला मोबाईल तसेच रोख रक्कम व दागिने असलेली पर्स असा एकूण ३ लाख ७२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर गुन्ह्राचे तपासादरम्यान तुळींज पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटिकरण पथकाने घटनास्थळाची पाहणी करून माहिती प्राप्त केली. सदरची चोरी राहुल नावाच्या आरोपीने केली असल्याची माहिती पोलीस शिपाई छपरीबन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आरोपीत राहुल सुनिल गाताडे (२३) याचा शोध घेवुन आरोपीत हा पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्यास ताब्यात पकडले. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्याला अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेला २० हजार रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन व एकुण ९१. ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण ३ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.