जळगावात घरफोडी सत्र थांबेना, सलग तीन घटना उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 08:50 PM2021-01-13T20:50:29+5:302021-01-13T20:51:04+5:30
Robbery : लॅपटॉप, दागिने व रोकड लांबविली
जळगाव : शहरात घरफोडींचे सत्र सुरु झाले असून मंगळवारी तीन घटना उघडकीस आल्यानंतर बुधवारीही पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगर येथे प्रदीप दिलीप सोनवणे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
पिंप्राळा परिसरातील पांडुरंग नगरात प्रदीप सोनवणे हे पत्नी वैशाली सोनवणे व मुलगा यश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. प्रदीप सोनवणे हे एम आर म्हणून काम करतात. ११ जानेवारी रोजी पत्नी वैशालीसह देवगाव,ता.जळगाव येथे शेतीकामासाठी गेले होते. तेथेच दोघे तेथेच मुक्कामी थांबले. बुधवारी सकाळी ११ वाजता प्रदीप सोनवणे यांना घराशेजारील पूजा पवार यांनी घरफोडी झाल्याची घटना कळविली. त्यानुसार प्रदीप पत्नीसह जळगावात घरी परतले. घरातील कपाटात ठेवलेली रोकड, दागिणे व लॅपटॉप हे दिसून आले नाही. चोरट्यांनी घरातून १० ग्रॅमचे ३० हजारांचे सोन्याचे मेडल, ७ ग्रॅमचे २० हजारांचे सोन्याचे कानातले, १५ ग्रॅमची ४५ हजारांची सोन्याची चैन, ५ ग्रॅमच्या ३० हजारांच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, दीड ग्रॅमचे १ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे मणी, १३ ग्रॅम ३४ हजारांचे सोन्याच्या अंगठ्या, पेंडल, कानातील बाळी या दागिण्यांसह २० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, व १६ हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे उघड झाले. सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबत रात्री वैशाली प्रदीप सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सतीष डोलारे करीत आहेत.