पुण्यात गृहपकल्प असल्याचे भासवले; भागीदारीच्या बहाण्याने व्यापाऱ्याला दीड कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 07:14 PM2022-09-20T19:14:10+5:302022-09-20T19:14:40+5:30
चौघांवर गुन्हा दाखल : पुण्तयात गृहप्रकल्पात नफ्याचे दाखवले आमिष
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : गृह प्रकल्पात गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यापाऱ्याला दिड कोटींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते घणसोली व कोपर खैरणेत राहणारे आहेत. २०१३ मध्ये त्यांनी हि रक्कम घेऊन देखील व्यापाऱ्याला भागीदार न करून घेतल्याने व पैसेही परत देण्यास नकार दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
वाशी मधील व्यापारी राजेश गुप्ता यांच्यासोबत हि फसवणूक झाली आहे. ते एपीएमसी मधील व्यापारी असल्याने त्याठिकाणी त्यांची संदीप सदाशिव चासकर व वामन आनंद चव्हाण यांच्यासोबत ओळख झाली होती. यावेळी दोघांनी गुप्ता यांना त्यांच्या बांधकाम प्रकल्पात ३० टक्के भागीदार होऊन नफा कमवण्याचे आमिष दाखवले. यासाठी भगवान देवराम सोलाट व अमीरजान अब्दुल कादर शेख यांच्यासोबत बैठक देखील घेतली. यावेळी त्यांना पुणेत खेड परिसरात ६८ गुंठे जमीन खरेदी केली असून अधिक ४५ गुंठे खरेदीसाठी रक्कम हवी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांच्यावर विश्वास ठेवून गुप्ता यांनी त्यांच्या ऋषिराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये १ कोटी ६४ लाख रुपये गुंतवले होते. परंतु २०१३ मध्ये हि रक्कम देऊनही त्यांना कागदोपत्री भागीदार करून घेण्यास टाळाटाळ सुरु होती. शिवाय घेतलेली रक्कम देखील परत करण्यास नकार दिला जात होता.
यामुळे झालेल्या फसवणूक प्रकरणी त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याद्वारे संदीप चासकर, भगवान सोलाट, अमीरजान शेख व वामन चव्हाण यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघेही घणसोली व कोपर खैरणे परिसरात राहणारे आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत.