उद्योगपती हर्षद ठक्कर बेपत्ता; दादर पोलिसांचा तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 05:45 PM2018-10-22T17:45:48+5:302018-10-22T17:46:24+5:30
मरिन ड्राईव्ह येथे सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु
मुंबई - आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हर्षद ठक्कर हे बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबियांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेअर बाजारात मोठे आर्थिक नुकसान झाल्याने २ ऑक्टोबरपासून हर्षद ठक्कर घरी गेलेच नाहीत. आशापुरा इंटिमेन्टस फॅशन लिमिटेड ही कंपनी देशभरात अंतर्वस्त्रासाठी प्रसिद्ध आहे. दादर पोलीस हर्षद ठक्कर यांचा शोध घेत आहे. ठक्कर कुटुंबीय, नातेवाईक, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि मित्रांकडे चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले. ७ ऑक्टोबरला मरिन ड्राईव्ह येथे एक अज्ञात मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे समजते. ठक्कर कुटुंबीयांच्या डीएनएचे नमुने घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
२ ऑक्टोबरला हर्षद शेवटचे दादर येथील पॅसिफिक प्लाझा या इमारतीतील कार्यालयात दिसले. त्यावेळी निघण्यापूर्वी त्यांनी मोबाईल, पाकिट आणि पासपोर्ट कार्यालयात ठेवून दिले. यासोबत त्यांनी एक गुजराती भाषेत चिठ्ठी देखील ठेवली होती. कंपनीच्या शेअर्ससाठी मी माझी संपत्ती गहाण ठेवली आहे. शेअर बाजारातील काही लोक कंपनीविरोधात काम करत आहे. यामुळेच कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मला कोणाकडूनही काहीच नको आहे. माझं काय होईल याची मला कल्पना नाही. पण मला सर्वांनी माफ करा. अनेक गुंतवणूकदारांच्या नुकसानासाठी मी कारणीभूत आहे. हे मला सहन होत नाही. मी कधीही कोणाची फसवणूक केलेली नाही. माझ्या विम्यातून येणारी रक्कम कंपनीला द्यावी, असे चिट्ठीत लिहिले आहे.