499 रुपयांचे केले पेमेंट, कट झाले 1.22 लाख रुपये...; नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनच्या नावाखाली फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 08:56 AM2022-12-03T08:56:15+5:302022-12-03T08:56:51+5:30
स्कॅमर्सनी जुहू येथील पीडित व्यावसायिकाची ऑनलाइन 1.22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
नवी दिल्ली : सध्या सर्व व्यवहार ऑनलाइन होताना दिसून येत आहेत. मात्र, या डिजिटलच्या जगात अनेकदा लोक मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत. कधी वीजबिलाच्या नावाखाली, तर कधी अन्य मार्गाने फ्रॉडस्टर्स लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करत आहेत. असाच काहीसा प्रकार मुंबईतील एका 74 वर्षीय व्यावसायिकासोबत घडला.
स्कॅमर्सनी जुहू येथील पीडित व्यावसायिकाची ऑनलाइन 1.22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन रिन्यू करण्याचा प्रयत्न करताना वृद्ध पीडिताला फसवले गेले आहे. स्कॅमर्सनी व्यावसायिकाला नेटफ्लिक्सच्या रिन्यूअलची माहिती मेलद्वारे दिली. 499 रुपयांच्या रिन्यूअलच्या नादात व्यावसायिकाचे 1.22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाला एक मेल आला होता, ज्यामध्ये नेटफ्लिक्स खात्याचे रिन्यूअल करण्याबाबत सांगण्यात आले होते. या वयस्कर व्यावसायिकाला वाटले की, हा मेल नेटफ्लिक्सवरून आला आहे. यामध्ये युजरला 499 रुपये भरून नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन सुरू ठेवण्यास सांगण्यात आले होते. व्यावसायिकाला वाटले की, तो अधिकृत मेल आहे, कारण तो नेटफ्लिक्सच्या अधिकृत मेलसारखा दिसत होता. मेलमध्ये ऑनलाइन पेमेंटची लिंकही देण्यात आली होती. व्यावसायिकाने काहीही विचार न करता या लिंकवर क्लिक केले आणि त्यात त्याचे क्रेडिट कार्ड डिटे्स टाकले.
यानंतर त्याने काहीही विचार न करता OTP शेअर केला आणि त्यांच्या खात्यातून 1.22 लाख रुपये कापले गेले. या व्यवहाराबाबत बँकेतून फोन आल्यावर पीडित व्यावसायिकाला ही बाब समजली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, "फसवणूक करणाऱ्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये 499 रुपये भरल्याची लिंकही होती. पीडितेने कोणताही विचार न करता या लिंकवर क्लिक केले आणि त्याच्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स टाकले. यानंतर त्यांच्या फोनवर 1.22 लाख भरण्यासाठी ओटीपी आला."