नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:51 PM2024-10-28T17:51:13+5:302024-10-28T17:52:06+5:30
पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. यावेळी लाल रंगाच्या मर्सिडीज बेंझने त्यांचं लक्ष वेधून घेतलं.
कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यातील कॉफीच्या मळ्यात तीन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तीचा जळालेला मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटवणं हे अवघड जात होतं. खूप तपास केल्यानंतर पोलिसांना समजलं की, हा मृतदेह ५४ वर्षीय व्यावसायिक रमेश यांचा आहे, जे काही आठवड्यांपूर्वी बेपत्ता झाले होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता रमेश यांची पत्नी निहारिका हिनेच ही हत्या केल्याचं उघड झालं.
निहारिकासोबत तिचा प्रियकर निखिल आणि दुसरा आरोपी अंकुर याने हत्येचा कट रचला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. यावेळी लाल रंगाच्या मर्सिडीज बेंझने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही कार रमेशच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं आढळून आलं. या कारच्या मदतीने पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावणं सहज शक्य झालं.
रमेशच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांचा तपास जसजसा पुढे जात होता. तसा तिच्या भूमिकेवर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी संशयाच्या आधारे निहारिकाला ताब्यात घेतलं. चौकशीत तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि तिने प्रियकर निखिल आणि अंकुर यांच्यासोबत मिळून पतीची हत्या केल्याचं सांगितलं.
हरियाणात राहत असताना आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात निहारिकाला जेलमध्ये जावं लागलं होतं. जेलमध्ये तिची अंकुरशी भेट झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर निहारिकाने रमेशशी लग्न केलं. हे तिचं दुसरं लग्न होतं. रमेशसोबत लग्न झाल्यानंतर निहारिकाचं नशीब फळफळलं.
एके दिवशी तिने पतीकडे आठ कोटी रुपये मागितले. रमेशने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे निहारिकाला राग आला. निहारिकाचे निखिलसोबत अफेअर होते. रमेशची मालमत्ता हडप करण्यासाठी तिने हत्येचा कट रचला. १ ऑक्टोबर रोजी या व्यावसायिकाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर, निहारिका ८०० किमीपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या कोडागु येथे गेली आणि कॉफीच्या मळ्यात मृतदेहाची विल्हेवाट लावली.