टोलच्या एका मेसेजने केली किडनॅपर्सची पोलखोल; वडिलांनी 'असा' वाचवला लेकाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:59 AM2023-10-26T10:59:34+5:302023-10-26T11:01:00+5:30
पोलिसांनी यमुना एक्सप्रेस वेवरील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट पाठवला आहे. आग्रा आणि परिसरातील पोलीस सक्रिय झाले. रास्ता रोको करून तपास सुरू करण्यात आला.
1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चोरट्यांनी व्यावसायिकाच्या 18 वर्षांच्या मुलाला किडनॅप केलं. त्यानंतर त्याला हरियाणातील फरिदाबाद येथून नोएडामार्गे यूपीत आणण्यात आलं. मात्र याच दरम्यान यमुना एक्स्प्रेस वेवर कार टोल मेसेज व्यावसायिकाच्या फोनवर पोहोचला. अशा प्रकारे किडनॅपर्सचं ठिकाण कळलं आणि पोलिसांनी त्यांना आग्राजवळ पकडलं. याशिवाय किडनॅप झालेल्या मुलालाही गाडीच्या डिक्कीमधून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
फरिदाबादमध्ये राहणारा 18 वर्षीय इशांत अग्रवाल हा बीबीएचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील आशिष अग्रवाल हे फर्निचर व्यावसायिक आहेत. गेल्या मंगळवारी इशांत फरिदाबादहून नोएडाला बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत वडील आशिष अग्रवाल यांची कार आणि त्यांचा ड्रायव्हर आकाश यादव होता. आकाश हा यूपीच्या मैनपुरीचा रहिवासी आहे.
काही तासांनंतरही इशांत नोएडाला पोहोचला नाही तेव्हा आशिष अग्रवाल य़ांनी त्याला फोन केला. मात्र इशांतचा फोन बंद होता. मग मी आकाशला फोन केला तर त्याचा फोनही चालत नव्हता. आशिषने हा प्रकार नोएडातील पारस गुप्ता यांना सांगितला. इशांतला पारस यांच्या घरी पोहोचायचे होते. अशा स्थितीत दोन्ही घरातील लोकांनी इशांतचा शोध सुरू केला. इशांतचे वडील आशिष अग्रवाल यांच्या मोबाइलवर यमुना एक्स्प्रेस वे टोलचा मेसेज आल्यावर त्यांना संशय आला.
आशिषच्या कारमध्ये फास्ट टॅग लावण्यात आला होता. टोल ओलांडताच पैसे कापले गेले, याचा मेसेज थेट आशिष अग्रवाल यांच्या मोबाईलवर गेला. त्यांनी तत्काळ पोलीस व टोल कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर फरिदाबाद पोलिसांनी यमुना एक्सप्रेस वेवरील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट पाठवला आहे. आग्रा आणि परिसरातील पोलीस सक्रिय झाले. रास्ता रोको करून तपास सुरू करण्यात आला. वाहनं रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यामध्ये एक संशयास्पद कार दिसली. तपासणी केली असता, त्याच्या डिक्कीमध्ये इशांत सापडला.
एसीपी एतमादपूर सौरभ सिंह यांनी सांगितलं की, खंदौली पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती की, इशांत अग्रवाल याचे ड्रायव्हर आकाश यादव अपहरण करून त्याला यमुना एक्स्प्रेस वेवर घेऊन जात आहे. त्यावर संपूर्ण टीमसह एक्स्प्रेस वे टोल नाक्यावर सखोल तपासणी सुरू करण्यात आली. सुमारे 30 मिनिटांनंतर ती कार नोएडाहून येताना दिसली. किडनॅपर्सनी तपासणी करताना पाहिले असता त्यांनी वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर पकडले गेले. पोलिसांनी गाडीची डिक्की उघडली तेव्हा इशांत अग्रवाल दिसला. त्यानंतर पोलिसांनी दोन किडनॅपर्सना ताब्यात घेतलं.