धक्कादायक! भाईंदरमध्ये भरदिवसा पोलीस चौकीजवळ मारहाण करून व्यावसायिकाला लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 03:11 PM2021-11-13T15:11:14+5:302021-11-13T15:23:18+5:30

Crime News : डोक्यात दगड मारून बेदम मारहाण करून मोबाईल लुटून नेल्याची घटना भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडली आहे.

businessman was beaten and robbed near a police post during the day In Bhayander | धक्कादायक! भाईंदरमध्ये भरदिवसा पोलीस चौकीजवळ मारहाण करून व्यावसायिकाला लुटले 

धक्कादायक! भाईंदरमध्ये भरदिवसा पोलीस चौकीजवळ मारहाण करून व्यावसायिकाला लुटले 

Next

मीरारोड - भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर रेल्वे तिकीट केंद्र व पोलीस चौकी जवळील पुलाखाली एका व्यावसायिकास तिघांनी लोकलचे तिकीट काढायचे म्हणून १० रुपये मागण्याच्या बहाण्याने डोक्यात दगड मारून बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल लुटून नेल्याची घटना भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी घडली आहे. लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. या घटनेने परिसरातील लुटमारीचा आणि कायम बंद असलेल्या पोलीस चौकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे . 

भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील लकी स्टार गल्लीत राहणारे कपडे व्यावसायिक देवीलाल सालवी (३६) हे भाईंदर पश्चिमेला कपडा घेऊन गुरुवारी सकाळी ११ . ३० च्या सुमारास बालाजी नगर येथील पूर्व - पश्चिम जोडणाऱ्या पादचारी पूल जवळून रेल्वे तिकीट केंद्र येथे तिकीट घेण्यासाठी जात होते.  पुलाजवळ तीन अनोळखी तरुण उभे होते व त्यात एकाचे हातात बासरी होती. एकाने देवीलाल यांना १० रुपये द्या, मला तिकीट काढायचे आहे असे सांगितले. त्यावर त्यांनी माझ्यासोबत चल तुला तिकीट काढून देतो असे म्हटले. 

तरुणाने पैसेच पाहिजे सांगत झटापट सुरू केली व पँन्टच्या खिशात हात घातला. तोच इत्तर दोन साथीदार आले आणि तिघांनी मिळून देवीलाल यांना खाली पाडून त्यांच्या खिशातील मोबाईल व पर्स काढू लागले. देवीलाल यांनी विरोध केला असता मारहाण करत तेथील दगड उचलून डोक्यात मारला.  त्यामुळे रक्तबंबाळ झालेल्या देवीलाल यांचा १४ हजारांचा मोबाईल घेऊन तिघे लुटारू पळून गेले.

थोडयावेळाने रेल्वे पोलीस आले असता त्यांनी देवीलाल यांच्यावर प्रथोमचार करून फिर्यादी साठी भाईंदर पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. भाईंदर पोलिसांनी तीन अनोळखी तरुणां विरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने येथील प्रवासी आणि पादचारी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी भाईंदर पोलिसांची चौकी असून देखील ते नेहमीच बंद असते. पोलिसांची रेल्वे मार्गालगत गस्त नसते. रात्री तर भीतीचे वातावरण असते.
 

Web Title: businessman was beaten and robbed near a police post during the day In Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.