व्यावसायिकाचा गळा चिरला; कट लागल्याच्या वादातून एकवीरा चाैकात थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 08:21 PM2021-03-14T20:21:49+5:302021-03-14T20:22:52+5:30
Attempt to Murder Case : दाेन तरुणांनी वेळेचे भान राखत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने जखमीचे प्राण वाचले.
यवतमाळ : शहरातील भाईगिरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. क्षुल्लक कारणावरून जीवघेणा हल्ला करण्याचे काहीच वाटत नाही. शनिवारी मध्यरात्री एकवीरा चाैकात दुचाकीचा कट लागला म्हणून ऑटाेडील व्यावसायिकाचा तिघांनी गळा चिरला. हा व्यावसायिक जखमी अवस्थेत कसाबसा तेथून पळाला. गळ्यातून रक्ताची धार सुरू असताना त्यांने मेडिकल चाैकापर्यंत प्रवास केला. नंतर ताे येथील खानावळीत दुचाकीसह धडकला. दाेन तरुणांनी वेळेचे भान राखत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने जखमीचे प्राण वाचले.
पंकज शहा (४५) रा. उज्ज्वल नगर असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्यावर आराेपी विक्की पाेंगाडे (२४) रा. साने गुरुजी नगर लाेहारा, सुरश श्यामकुंवर ऊर्फ शूटर (२८) रा. सिंचन नगर व लाेहारा येथील एकाने हल्ला केला. हे तिन्ही आराेपी एकवीरा चाैकातून जात हाेते. दरम्यान, त्यांनी दुचाकीला कट लागला यावरून पंकज शहा याच्याशी वाद घातला. या वादात आराेपीने पंकजच्या गालावर व गळ्यावर चाकूने वार केले. घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पाेलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे,शाेध पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहुल गुहे यांनी तक्रारार येण्यापूर्वीच तत्काळ संशयित आराेपींचा शाेध सुरू केला. घटनेनंतर काही तासातच गुन्ह्यातील तिन्ही आराेपींना अटक केली. तक्रार आल्यानंतर आरोपी विराेधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पंकज शहा यांचा मागील दिवाळीच्या एक दिवस आधी आर्णी मार्गावर मोठा अपघात झाला हाेता. यात त्याच्या दाेन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. पकंज अपघातातून सुखरूप बचावला हाेता.
गंभीर अवस्थेत एकवीरा चाैक ते मेडिकल चाैक प्रवास
घटनास्थळावरून पंकजने कशीबशी सुटका करून घेत दुचाकीने पळ काढला. रक्ताची धार सुरू असताना पंकज थेट शासकीय रुग्णालयाकडे निघाला. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने ताे चालत्या दुचाकीवरच बेशुध्द झाला. तो दुचाकीसह मेडिकल चाैक परिसरातील एका खानावळीत शिरला. नेमका काय प्रकार आहे हे तेथील नागरिकांच्या लक्षात आला नाही. दारूच्या नशेत अपघात झाला असे उपस्थितांना वाटले. त्यामुळे काेणीच मदतीसाठी पुढे येत नव्हते. हा प्रकार तेथून जाणाऱ्या ललित जैन याच्या निर्दशनास आला त्याने तत्काळ आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने पंकजला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डाॅक्टरांनी लगेच शस्त्रक्रिया करून पंकजचे प्राण वाचविले. नंतर घटनेची माहिती त्याच्या नातेवाइकांना देण्यात आली.