मित्राशी चॅटिंगमध्ये गुंग होती; पतीने हटकताच नाकाचा चावा घेत केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:17 PM2020-01-13T22:17:10+5:302020-01-13T22:19:04+5:30
याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरारोड - पत्नीला मित्राशी चॅटिंग का करतेस ? असे पतीने विचारल्याने त्याचा राग येऊन पत्नीने पतीस शिवीगाळ, ठोशा बुक्कायांनी मारहाण करत नाकावर चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती हा ३१ वर्षांचा असून वसई - नालासोपारा लिंक रस्त्यावर आपल्या आई वडिलांसोबत राहतो. तो खाजगी बँकेत नोकरीला असून २०११ साली भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या तरुणीशी (२७) आंतरधर्मिय प्रेमविवाह झाला होता.परंतु दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने वसई दिवाणी न्यायालयात दावा सुरु आहे. त्यामुळे पत्नी ही माहेरी आपल्या मुलीसह राहते.
मुलीच्या शालेय क्रिडा स्पर्धा असल्याने पत्नीने फोन करुन पतीला कार्यक्रमास येण्याचे सांगितले होते. तो शनिवारी सकाळी मुलीच्या शाळेच्या कार्यक्रमास येऊ शकला नाही. परंतु दुपारी तो सासरी आला. पत्नीने न आल्याबद्दल विचारणा केली असता त्याने पुतणीची प्रकृती ठिक नसल्याने तिला सांताक्रुझ येथे रुग्णालयात दाखल केले असल्याने सकाळी येऊ शकलो नाही असे सांगितले.
त्यावर ती रागाने बेडरूममध्ये गेली. त्याने तिचा लॅपटॉप पाहिला असता त्यात तीने मित्राशी चॅटींग केल्याचे दिसून आले. तू मित्राशी चॅटिंग का करतेस? अशी विचारणा त्याने केली. त्यावर रात्री बोलु असे सांगत तिने टाळले. शनिवारच्या मध्यरात्रीनंतर दिडच्या सुमारास पुन्हा त्याने मित्राशी चॅटिंग केल्यावरुन तिला जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. संतप्त पत्नीने पतीला शिवीगाळ करत ठोशा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच त्याच्या नाकाला चावा घेऊन जखमी केले.